अवजड वाहनांच्या रहदारी संदर्भातील आदेशाची पोलिसांकडूनच पायमल्ली होत असल्याने अपघात-अश्विनी भंडारेंच्या अपघातास कारणीभूत पोलिसावर कारवाई करावी; पोलिस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर- शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकी संदर्भातील आदेशाची पोलिस दलाकडून होत असलेल्या पायमल्लीमुळे व अनास्थेमुळे अपघात घडत आहेत. या अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिल्यामुळे अश्विनी धनंजय भंडारे यांना 22 नोव्हेंबर रोजी पहाटे अपघातात जीव गमवावा लागला. या अपघातास जबाबदार असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भंडारे कुटुंबियांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून त्यात संजय यशवंतराव भंडारे यांनी म्हटले आहे की, पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार दि.20/11/2020 ते दि.26/11/2020 दरम्यान 22.00 पासून पहाटे 6.00 पर्यंत अहमदनगर शहरातील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वहातुक बंद असणे अपेक्षित होते. मात्र या आदेशाची पायमल्ली करीत शहाराभोवतीच्या चेकपोस्टवरून सर्रासपणे अवजड वहाने शहरात सोडली गेल्याचे निदर्शनास आले आहे. अशाच एका अवजड वाहनाच्या धडकेमुळे दि.22/11/2020 रोजी पहाटे 5.30 च्या दरम्यान माझ्या धाकट्या बंधूंच्या पत्नी अश्विनी धनंजय भंडारे, वय 54 वर्षे यांचा स्टेट बँकेसमोर जागीच मृत्यू झाला आहे व आमचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुःखद घटनेच्या अनुषंगाने योग्य कार्यवाही होऊन न्याय मिळण्याच्या अपेक्षेने सदर अर्ज सादर करीत आहे. सदर अपघाताची घटना घडलेल्या प्रसंगी अपघाताच्या रस्त्यावर अवजड वाहनांची रहदारी चालूच असल्याचे आम्हास आढळून आले आहे. यावरून आपल्या वर उल्लेखित आदेशाची शहराबाहेरील चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या आपल्या पोलिसांनी पायमल्ली केल्याचे दिसून येते, कर्तव्यात कसूर करून सदर अपघातास कारणीभुत ठरलेल्या या पोलीस कर्मचार्‍यांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी. या अपघाताच्या तपासासाठी सक्षम पोलिस अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी. अपघातग्रस्त स्थळाच्या परिसरातील रस्त्यावरील सर्व सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची पहाटे 5.20 ते 5.40 वेळेतील फुटेजची सखोल तपासणी करावी व इतर योग्य त्या सर्वप्रकारच्या मार्गाचा यथाशक्ती अवलंब करून कै. अश्विनी यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या वाहनाचा छडा लावण्यात यावा. चांदणी चौक ते स्टेट बँक चौक या 500 मिटरच्या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण खूप जास्त आहे. या वस्तुस्थितीची गंभीरपणे दखल घेऊन नागरिकांचे नाहक होणारे मृत्यू टाळण्यासाठी योग्य त्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भंडारे यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा