70 वर्षीय वृद्धाने श्रमदान करीत बुजवले शहरातील रस्त्यावरील खड्डे

अहमदनगर- वाळुचे ट्रक व इतर अवजड वाहनांमुळे रस्ता खचून मोठे खड्डे पडले. महिनाभर याकडे प्रशासनाचे अधिकारी किंवा स्थानिक नगरसेवकांनी लक्ष न दिल्याने खड्ड्यांमुळे वारंवार होत असलेले अपघात पाहून 70 वर्षीय वृद्धाने हाती फावडे-घमेले घेऊन श्रमदान करीत हे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. नगर शहराच्या गोविंदपूरा भागातील रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून दुर्दशा झालेली आहे. रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणारे ट्रक या रस्त्यावरुन जात असल्याने रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. बर्‍याच ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. गेल्या महिन्याभरापासून एका मोठ्या खड्ड्याकडे स्थानिक नगरसेवकांसह प्रशासनानेही दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या ठिकाणी दररोज छोटे-मोठे अपघात होत होते. या रस्त्याने दररोज जाणारे गुरुद्वारा येथील सेवक बाबाजी कर्नलसिंग यांनी या ठिकाणी होणार्‍या अपघातांचे दृश्य वारंवार पाहिले. खड्डे बुजविण्याची कार्यवाही कोणीही करत नसल्याने शेवटी त्यांनीच हाती फावडे-घमेले घेत रस्त्याच्या कडेला पडलेला मुरुम उचलून खड्ड्यात आणून टाकला. 70 वर्षीय बाबाजींनी केलेल्या श्रमदानामुळे खड्डा बुजला असल्यामुळे या ठिकाणची अपघाताची मालिका आता तरी खंडीत होईल, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.बाबाजींच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा