शिष्योत्तम

“बाबूजी, आपण आल्यागेल्या सगळ्यांना मदत करता. अशानं स्वतःजवळ काय शिल्लक राहणार?” एकदा त्यांच्या मुनिमानं त्यांना विचारलं. त्यावर बाबूजी मुनिमाला म्हणाले, “बाबारे, धन कमवावं, जरूर कमवावं; पण त्याचा साठा करून ठेवू नये. अती धन-भक्ती चांगली नाही. गौतम बुद्ध तर राजमहाल सोडून गेले. महंमद पैगंबर तर उपवास करणारा एक फकीर होता. नानकांनी कुठे उठवल्या हवेल्या? जगाला मार्ग दाखवणारे हे सारे स्मरणीय पुरुष निष्कांचनच होते. धनाचा फार लोभ चांगला नाही. ते धन काय कामाचं जे कोणाच्या उपयोगी पडणार नाही.” असा या देवमाणसाच्या सहवासात कृष्णकांतबाबू राहिले होते. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सुवर्ण बनतं, तसंच कृष्णकांतबाबूचं झालं होतं.

मूळचेच सात्विक असलेले कृष्णकांतबाबू, बाबूजींच्या सहवासात अधिकच उजळून निघाले. सुसंगतीचा परिणाम हा असा असतो. कृष्णकांतबाबूंना एक प्रसंग आठवला. बाबूजींचा पुत्र होता देवदत्त. देवदत्तही सरस्वती विद्यालयातच शिकत होता. कृष्णकांतबाबू आपल्या सद्वर्तनानं मुलांवर सुसंस्कार करत. एकदा त्यांनी वर्गातील सगळ्या मुलांना सहलीला नेलं. सहल गावाजवळच्याच एका निसर्गरमणीय ठिकाणी होती. सहलीसाठी मुलांजवळून त्यांनी प्रत्येकी एक रुपया घेतला होता. सहल पायीच जाणार होती. देवदत्तानं अजून रुपया आणून दिलेला नव्हता. सहलीचा दिवस उजाडला. मुलं शाळेत जमली. “देवदत्त, तू रुपया आणला नाहीस? कृष्णकांतबाबूंनी विचारलं. “मी कशाला द्यायचं पैसे? आणि पैसे हवेत कशाला? सहलीला तर आपण पायीच जाणार आहोत ना?” “हो, पायीच जाणार; पण तुम्हाला पुढे नदी ओलांडावी लागणार. नावाड्याला नकोत का द्यायला? त्यासाठी सांगितले पैसे.” “शाळा माझ्या वडिलांची आहे. मी पैसे दिले नाहीत, तरी चालू शकतं.” “देवदत्त, तू इतर विद्यार्थ्यांसारखाच एक विद्यार्थी आहेस हे लक्षात ठेव. तुझा पिता कोण हे या ठिकाणी महत्त्वाचं नाही. सगळ्या मुलांना जे नियम तेच तुलाही.” रागारागानं देवदत्तानं एक रुपया दाणकन् कृष्णकांत बाबूंच्यापुढे आणून आपटला. कृष्णकांतबाबूंनी तो रुपया उचलला. रुपया खोटा होता. त्यांच्या ते लगेच लक्षात आलं; पण ते काही बोलले नाहीत. (क्रमश:)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा