नगरमध्ये तीन उमेदवारांचे अर्ज बाद

अहमदनगर- विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर मतदार संघातून शुक्रवार (दि.4) अखेर 17 उमेदवारांचे 21 अर्ज दाखल झाले होते. यापैकी 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे निवडणुक रिंगणात 14 उमेदवार राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी (दि.7) दुपारी 3 वाजेपर्यंत असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.4) दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीत 17 उमेदवारांचे 21 अर्ज प्राप्त झाले होते. या दाखल अर्जांची छाननी शनिवारी (दि.5) करण्यात आली. छाननीमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या राजू हिरालाल गुजर, सुरेश किसनराव गायकवाड, सुभाष पांडुरंग शिंदे यांचे अर्ज बाद झाले असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात श्रीराम येंडे (अपक्ष), श्रीधर दरेकर (अपक्ष), अनिल राठोड (शिवसेना), संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस), संदीप सकट (अपक्ष), बहिरनाथ वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), संजय कांबळे (अपक्ष), किरण काळे (वंचित बहुजन आघाडी), संतोष वाकळे (मनसे) सुनिल फुलसौंदर (अपक्ष), सचिन राठोड (अपक्ष), श्रीपाद छिंदम (बसपा), प्रतिक बारसे (अपक्ष), मिर असिफ सुलतान (अपक्ष) यांचे अर्ज राहिलेले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत सोमवारी (दि.7) दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.