म्युच्युअल फंड सतत बदलताय?

जगातील नकारात्मक वातावरण पाहता भारतात स्थिर सरकार येऊनही यावर्षी शेअर बाजारात अडीच हजार अंशांची घसरण नोंदली गेली आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मात्र काही गुंतवणूकदार चालू योजनेतून पैसा काढून अन्य चांगली कामगिरी करणार्‍या योजनेत जमा करत आहेत. मात्र अशी कृती फायद्याची नसल्याचे अर्थतज्ञ सांगतात.

घसरण ही खरेदीची संधी : बाजारातील घसरण ही खरेदीची संधी मानायला हवी. चढ उतार हा बाजाराचा हिस्सा आहे. त्यामुळे त्याला घाबरून जाण्याची गरज नाही. काही दिवस किंवा काही महिने चालणार्‍या घसरणीमुळे निर्णय बदलण्याऐवजी सध्याच्या फंडमध्ये राहिलेले कधीही फायद्याचे. बाजारातील घसरणीमुळे कमी दरात युनिट मिळत आहेत. संपूर्ण वर्षात एखादा फंड नुकसानकारक ठरत असेल आणि खराब कामगिरी करत असेल तर त्यातून पैसा काढण्याचा विचार करावा.

कमी कालावधीत नुकसान पण दिर्घकाळात फायदा : शेअर बाजाराशी निगडीत म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडच्या लार्ज कॅप श्रेणीत एका वर्षात 0.70 टक्के नुकसान झाले आहे. मात्र तीन वर्षात 8.30 टक्के तर पाच वर्षात 8.70 टक्के लाभ मिळाला आहे. जर एखादा फंड कमी कालावधीत नुकसानकारक ठरत असेल तर तो निश्‍चित दीर्घकाळासाठी चांगला फायदा देईल.

करसवलतीने नुकसानीची भरपाई : एका वर्षानंतर शेअरची विक्री केल्यास त्यापासून मिळणारा नफा हा करमुक्त असतो. तसेच एका वर्षात इक्विटी स्किममधून दहा टक्के नुकसान होत असेल तर कर सवलतीच्या रुपातून काही प्रमाणात त्याची भरपाई होते आणि नुकसान कमी राहते.

शुल्काचे आकलन : म्युच्युअल फंडमध्ये फंड व्यवस्थापन आणि अन्य खर्च पाहता फंड बदलताना 1.75 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जावू शकते. त्याचबरोबर योजनेच्या बाहेर पडताना आणि दुसर्‍या योजनेत गुंतवणूक सुरू करण्यावरही फी आकारली जावू शकते. जर एका वर्षाच्या आत एका फंडमधून दुसर्‍या फंडमध्ये प्रवेश केल्यास शुल्कापोटी अडीच टक्क्यांपर्यंत खर्च येतो. जर दुसर्‍या योजनेतून लाभ जरी मिळाला तरी त्यातून अडीच टक्के वगळून तो लाभ पाच ते साडेपाच टक्के राहतो. त्यामुळे अन्य गुंतवणुकीच्या तुलनेत आपण नुकसानीत राहतो. त्यामुळे घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये. फंडमधून पैसा काढण्यापूर्वी पाच वर्षापर्यंत त्याची कामगिरी पाहावी. जर फंड सतत खराब कामगिरी करत असेल तर बाहेर पडणे हिताचे.

वेगवेगळे फंड ठेवा : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसाठी एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. एकरक्कमी आणि एकाचवेळी पैसे गुंतवण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने किंवा एसआयपीने यूनिट खरेदी करणे फायद्याचे ठरते. तसेच एकाच म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकण्यापेक्षा वेगवेगळ्या फंडची निवड करून जोखीम कमी करावी. डेट फंड, डायव्हर्सिटीफाइड फंड, इक्विटी, गोल्ड यासारख्या योजनेत पैसे गुंतवणूक करून म्युच्युअल फंडमध्ये वैविध्य ठेवावे. एकाच ठिकाणी दहा हजाराची एसआयपी करण्यापेक्षा अडीच हजाराच्या चार एसआयपी सुरू करणे फायद्याचे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा