पंकजा मुंडे यांनी भाजपातच राहून गोपीनाथ मुंडे यांचे कार्य पुढे न्यावे – श्रीकांत साठे

शहर भाजपाच्यावतीने स्व.गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अहमदनगर – भारतीय जनता पार्टीत सर्वसामान्य नागरिकांना आणुन पक्षास संपूर्ण महाराष्ट्रात रुजविण्याचे बहुमुल्य काम स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केले. उसतोडी कामगारांच्या प्रश्‍नांपासून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. स्वत: सर्वसामान्य असल्याने अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी उभे केले. 1995 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच 2014 साली केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आणण्यातही गोपीनाथ मुंडे यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. असा बहुआयामी नेता अचानक निघून गेल्याने सर्वांच्या मनाला चटका बसला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांवर काम करुन पक्षाचे काम वाढविणे असा संकल्प आपण सर्वजण करु. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कामाची सर्व धुरा सांभाळली आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवामुळे पंकजा मुंडे काहीशा नाराज असल्याने वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांनी भाजपातच राहून स्व.गोपीनाथ मुंडे यांचे कार्य पुढे न्यावे, आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीकांत साठे यांनी केले.

दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत साठे बोलत होते. यावेळी माजी गटनेते सुवेंद्र गांधी, भाजपा संघटन सरचिटणीस किशोर बोरा, नरेंद्र कुलकर्णी, वसंत राठोड, शिवाजी दहिंडे, तुषार पोटे, मिलिंद भालसिंग, लक्ष्मीकांत तिवारी, संजय सातपुते, नाथ देवतरसे, नितीन जोशी, किशोर कटोरे, भरत सुरतवाला, पियुष संचेती, गोकुळ फराटे, अमित तिवारी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुवेंद्र गांधी म्हणाले, बीड जिल्हा कर्मभुमी असलेले गोपीनाथ मुंडे कायम नगरला मावशी म्हणायचे. त्यामुळे नगरवर त्यांनी आई इतकेच प्रेम केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळेच दिलीप गांधी नगरसेवक ते खासदार व केंद्रीय मंत्री झाले. 2014 साली केंद्रीय मंत्रीपदी त्यांची वर्णी लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला होता. मात्र त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. आजही आम्ही सर्वजण स्व.गोपीनाथ मुंडे यांनी दाखविलेल्या वाटेवर चालत पक्षाचे काम करत आहोत. त्यांचे कार्य आमच्यासाठी कायम प्रेरणादायी राहील.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव शेलार यांचे निधन झाले. त्यांनाही श्रद्धांजली या बैठकीत वाहण्यात आली. यावेळी संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांनी प्रास्तविक केले. वसंत राठोड यांनी आभार मानले.