जडणघडणीच्या वयातच तरूणाईने सकारात्मक विचारांची रूजवण करावी – उमेश दोडेजा 

अहमदनगर – इतरांमधील दोष न पाहता त्यांच्यातील सद्गुण पाहिले तर संपूर्ण जग प्रचंड सकारात्मकतेने भरलेले दिसू शकते. अशा वातावरणात सर्वांचीच चांगली प्रगती होवू शकते. एकमेकांप्रती आदरभाव, परस्पर सौहार्द व मिठास वाणी या गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या पाहिजे. गुरु नानक देवजी यांनी दिलेला एकतेचा संदेश संपूर्ण विश्वात पोहचलेला आहे. भक्ती, श्रम व दुसर्‍याची काळजी घेणे या तत्वांचा अंगिकार करणारा प्रत्येकजण आयुष्यात सुखी-समाधानी राहू शकतो, आपले ध्येय गाठू शकतो, असा संदेश गुरु नानक यांच्या जीवनकार्यातून मिळतो. जडघडणीच्या वयात तरूणाईने हा संदेश आवर्जून आचरणात आणावा, असे प्रतिपादन नगरमधील अप्राईझ ट्युटोरियल्सचे संचालक सी.ए.उमेश दोडेजा यांनी केले.

गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त अप्राईझ ट्युटोरियल्समध्ये अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. यात गुरुनानक यांच्या मिठी बोली या संदेशानुसार विद्यार्थ्यांना एकमेकांप्रती वाटणार्‍या चांगल्या भावना चिठ्ठीतून व्यक्त करण्यास सांगण्यात आले होते. या उपक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुला मुलींनी एकमेकांमधील चांगले गुण, स्वभाव वैशिष्ट्ये, सहकार्यासाठी असलेली तत्परता याबाबत दिलखुलासपणे स्तुतीपर चिठ्ठया लिहिल्या. एकमेकांमधील गुण, चांगुलपणा या गोष्टी मनातून कागदावर उतरवताना मुलेही उत्साहित झाल्याचे पहायला मिळाले. आपल्याबद्दल आपल्या मित्र मैत्रिणींनी शब्दरुपाने व्यक्त केलेल्या चांगल्या भावना वाचून सर्वच मुलांमध्ये एक वेगळेच भावबंध निर्माण झाले.

सी.ए.उमेश दोडेजा म्हणाले की, मिठी बोली अंतर्गत राबविलेल्या या उपक्रमातून मुलांना सकारात्मक दृष्टीकोनाची अतिशय मोलाची शिकवण निश्चितच मिळाली आहे. या चिठ्ठया प्रत्येकाला आयुष्यात प्रेरणा देणारा अनमोल ठेवा ठरतील. आयुष्यात कधीही नकारात्मक विचार मोठे होत चालल्याचे दिसून आल्यास या जपून ठेवलेल्या चिठ्ठयातून नवी उर्जा व ताकद मिळेल. विद्यार्थी या चिठ्ठया संग्रही ठेवून गुरुनानकजी यांचा मिठी बोलीचा संदेश कायम स्मरणात ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही या गुरुनानकजी यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करीत त्यांना श्रध्दापूर्वक नमन केले. यावेळी क्लासमधील सर्व प्राध्यापक, मार्गदर्शक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.