विवरणपत्रात चूक झाल्यास ….

प्राप्तीकर विवरण भरताना जर एखादी चूक झाली तरी घाबरण्याचे कारण नाही. प्राप्तीकर विभागाने करदात्याला चुक सुधारण्याची संपूर्ण संधी दिली आहे. जसे चुकीचा खाते क्रमांक, करसवलतीचा चुकीचा दावा आदीसंदर्भात दुरुस्तीची मूभा दिली आहे. रिटर्न भरणार्‍यांकडून आकडे आणि तथ्यात काही गडबड झाल्यास इफायलिंग पोर्टलमध्ये दिलेल्या कॉलमात योग्य पर्यायाची निवड करून त्यात बदल करता येते. यंदा 31 मार्च 2020 पर्यंत प्राप्तीकर विवरणात बदल करता येणार आहे. रिटर्न भरण्यास मुदतवाढ दिली असून शेवटची तारीख आता 31 ऑगस्ट आहे.

असा बदल करा : प्राप्तीकर कलम 139 (5) नुसार जर आयटीआर भरल्यानंतर काही चुकीचे आकडे किंवा तथ्याची जाणीव झाल्यास आपण त्यात संशोधन करू शकता. जर आपल्याला आकड्यात बदल करायचा झाल्यास आपण शेड्यूल, डोनेशन किंवा कॅपिटल गेन यासारख्या पर्यायाची निवड करावी. अर्थात रिटर्न दाखल करताना एकूण उत्पन्न आणि कपातीची रक्कम समान असणे गरजेचे आहे.

दुरुस्तीसाठी कागदपत्रे द्या : तथ्यांत सुधारणा करण्यासाठी आपल्याला कॉलममध्ये जावून नव्याने माहिती सादर करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे देखील जोडावी लागणार आहे. उदा. जर करसवलतीच्या कॉलममध्ये बदल करायचा असेल तर त्यासंबंधी कागदपत्रे ही ठरलेल्या आकारात अपलोड करावी लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी करणेही गरजेचे आहे.

प्रत्येक फॉर्ममध्ये बदल शक्य : यापूर्वी प्राप्तीकर विभाग हा काही श्रेणीतीच आयटीआरमध्ये बदल करण्याची सुविधा देत होते. आता मात्र प्रत्येक प्रकारच्या आयटीआर फॉर्ममध्ये बदल करू शकतो. जर आपण स्वत: रिटर्न भरण्यावरून साशंक असाल तर व्यावसायिक मंडळीची मदत घ्या. सरकारने रिटर्न भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

बदलास मोबाईल किंवा इमेलने पुष्टी देणे गरजेचे : बदल केल्यानंतर आपल्याला नोंदणीकृत मोबाईल आणि ईमेलवर पुष्टी करण्यासाठी मेसेज येईल. एवढेच नाही तर आपण केलेल्या सुधारणा या त्याचदिवशी परत घेतात येतात. तसेच बदलासंबंधीचा अर्ज देखील आपण परत घेऊ शकतो. मात्र वारंवार बदल स्वीकारले जातीलच असे नाही. प्राप्तीकर खाते अनेकदा बदल करण्यास परवानगी देते, मात्र त्या सुविधेचा दुरपयोग करू नये. अन्यथा रिटर्नची पडताळणी होऊ शकते.

शेवटच्या तारखेपर्यंत बदल शक्य : पूर्वी प्राप्तीकर खाते हे करदात्याला एक वर्षापर्यंत रिटर्नमध्ये बदल करण्याची परवानगी देत होते. मात्र गेल्यावर्षीच्या बदलानुसार रिटर्न भरण्याचा कालावधी हा चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत निश्‍चित केला आहे. जर आपण 2018-19 चा आयटीआर भरत असाल तर 31 मार्च 2020 पर्यंत बदल करू शकता. त्यानंतर बदल शक्य नाही.

बदलाची पुन्हा पडताळणी करा : जर आपण बदल केलेला आयटीआर भरला असेल तर पुन्हा एकदा पडताळणी, व्हेरिफाय करावे लागेल. व्हेरिफाय न केल्यास प्राप्तीकर विभाग नवे विवरण मान्य करणार नाही. ई- व्हेरिफिकेशनसाठी आधार, ओटीपी, नेटबँकिंगच्या माध्यमातून इव्हीसी याप्रमाणे सहा पद्धतीचा अवलंब करू शकतो.