भरवस्ती लगतच केला महापालिकेने कचरा डेपो

कचरा पेटवून दिल्याने धुर आणि दुर्गंधीने नागरिक झाले हैराण

अहमदनगर- महापालिकेच्या पदाधिकार्‍यांनी नगर शहर कचरामुक्त करण्याची केलेली घोषणा हवेतच विरताना दिसत असून या घोषणेच्या तिसर्‍याच दिवशी घनकचरा विभागाच्या कर्मचार्‍यांनी भरवस्तीलगतच कचरा डेपो केला आहे. विशेष म्हणजे शहरातून गोळा करुन आणलेला कचरा पेटवून दिल्याने मोठ्या प्रमाणावर परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होवून दुर्गंधी पसरली. त्यामुळे या परिसरातील रहिवाशी नागरिक तसेच रस्त्याने जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

शहरातील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या आयुर्वेद कॉलेज ते अमरधाम रस्त्यावर रिमांड होमच्या समोरील बाजूस मंगळवारी (दि.12) सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत हा प्रकार सुरु होता. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत सकाळपासून कचर्‍याच्या गाड्या आणून खाली केल्या जात होत्या आणि तो कचरा पेटवून दिला जात होता. त्यामुळे या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले होते. प्लॅस्टिकसह सर्व प्रकारचा कचरा पेटवून दिला जात असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीही पसरली होती. यामुळे या परिसरात राहणारे नागरिक, गाडगीळ पटांगणात भाजी विक्रीसाठी बसणारे विक्रेते, तसेच रस्त्याने ये-जा करणार्‍या नागरिकांना या धुराचा व दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे महापालिकेचे या गलथान कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.

महापालिकेने शहरात दररोज साचणारा कचरा उचलून तो कचराडेपोपर्यंत नेवून टाकण्यासाठी पुण्याच्या खासगी संस्थेला ठेका दिला आहे. तीन दिवसांपूर्वीच शनिवारी (दि.9) रोजी महापालिकेच्या अधिकारी-पदाधिकार्‍यांनी या ठेकेदार संस्थेने आणलेल्या 40 घंटागाड्या, 10 कंटेनर आणि 5 कॉम्पॅक्टर या वाहनांचे पुजन करुन कचरा संकलनाचा शुभारंभ केला होता. आता नगर शहर कचरामुक्त होईल अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र अवघ्या तीन दिवसातच शहर कचरामुक्त करण्याऐवजी शहरात भरवस्तीलगतच कचराडेपो करण्याचा प्रताप महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी केला आहे. हा फक्त कचराडेपो न करता तो आणुन टाकलेला कचरा पेटवून देऊन प्रदुषणात भर टाकत नागरिकांचे आरोग्य आणखी धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य अधिकारी करतात तरी काय?

शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाचा सध्यापुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाअंतर्गत येणारी सर्व कामे ठप्प आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे रोग पसरत आहेत. डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर उपाययोजना करताना महापालिकेचा आरोग्य विभाग कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे साथीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी असलेल्या डॉ.अनिल बोरगे यांच्याकडेच कोंडवाडा विभागाचीही जबाबदारी आहे. या विभागाच्या कामकाजाचाही बोजवारा उडालेला आहे. शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुरुच आहे. त्यातच आता आरोग्य अधिकार्‍यांच्या अखत्यारित असलेल्या घनकचरा विभागाच्या कर्मचार्‍यांचा गलथान कारभारही समोर आला आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांचे आपल्या विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर काही नियंत्रण आहे की नाही? आरोग्य अधिकारी नेमके करतात तरी काय? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.