मनसेच्या नव्या चेहर्‍याच्या रुपाने नगरकर निश्चित बदल घडवतील – सचिन डफळ 

संतोष वाकळे यांच्या जाहीर प्रचाराचा विशाल गणपती मंदिरात शुभारंभ

अहमदनगर- नगर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या विचारांनुसार काम करीत असून प्रस्थापितांच्या गैरकारभाराला वाचा फोडण्याचे काम मनसेने नेहमीच केले आहे. आताची विधानसभा निवडणुक खर्‍या अर्थाने नगरच्या भविष्यातील वाटचालीचा पाया रचणार आहे. त्यामुळेच मनसेने ‘बदलच हवा पण चेहरा नवा’ अशी हाक देत नगरकरांना साद घातली आहे. सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेल्यांना वैतागल्यानंतर नगरकरांनी पाच वर्षांपूर्वी बदल केला. परंतु, नगरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्यांनाही अपयश आले आहे. हिच बाब ओळखून मनसेने नगरकरांच्या मनातील विकासाचा दृष्टीकोन असलेला चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे, असे प्रतिपादन मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगर शहर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संतोष नामदेव वाकळे यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिरात आरती करून नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी डफळ बोलत होते. याप्रसंगी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, महिला आघाडीच्या अॅड.अनिता दिघे, अॅड. नामदेव वाकळे, मनसे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा, परेश पुरोहित, पोपट पाथरे, अशोक दातरंगे, अभिषेक मोरे, रतन गाडळकर, तुषार हिरवे, दीपक दांगट, अभिनय गायकवाड, गणेश शिंदे, अविनाश क्षेत्रे, अनिल धीवर आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नितीन भुतारे म्हणाले की, नगर शहराच्या विकासाचा मुद्दा घेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत. तीस वर्षात किती विकास झाला याचा पर्दाफाश करू. आमच्या प्रचारात रोज एका मुद्यावरून आजी माजी लोकप्रतिनिधींना उघडे पाडण्याचे काम करू. नगरकरांची सहनशीलता आता संपुष्टात आलेली असून साधेसाधे प्रश्न सोडवण्यात अपयश आलेल्यांना पुन्हा थारा मिळणार नाही. त्यामुळेच मनसेने संतोष वाकळे यांच्या रुपाने तरूण व अभ्यासू उमेदवार नगरकरांना सक्षम पर्याय म्हणून दिला आहे. मनसेला सर्वस्तरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवार संतोष वाकळे म्हणाले की, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिशय विश्वासाने आपल्याला उमेदवारी दिली आहे. तो विश्वास नगरकरांच्या पाठबळावर निश्चितच सार्थ ठरवू. नगरमधील अनेक समस्यांकडे 30 वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. मी संपूर्ण शहराचा अभ्यास करून गरज ओळखली आहे. शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला असून त्यानुसारच नगरचा नियोजनबध्द विकास करण्याचा माझा संकल्प आहे. तरूणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रचारात या मुद्दयांवरच भर देवून नगरकरांना कौल मागणार आहे.