24 तासात कचरा पेट्यांची व्यवस्था करा

शहरातील व्यावसायिकांना महापालिका प्रशासनाच्या नोटीसा

अहमदनगर- आपल्या व्यावसायाद्वारे निर्माण होणारा ओला-सुका कचरा याचे वर्गीकरण करुन तो साठविण्यासाठी 24 तासाच्या आत कचरा पेट्यांची व्यवस्था करावी अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा नोटीसा महापालिका प्रशासनाने शहरासह उपनगरातील व्यावसायिकांना बजावण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हाधिकारी तथा मनपा प्रभारी आयुक्त राहूल द्विवेदी यांच्या आदेशानुसार या नोटीसा बजावण्यात येत असून नोटीसा दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी शहराच्या विविध भागात प्रभाग समितीनिहाय कर्मचार्‍यांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. विविध प्रकारच्या व्यावसायिकांना दिलेल्या नोटीसांमध्ये म्हटले आहे की, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रात नागरिकांना घनकचरा संकलन, वाहतूक साफसफाई इत्यादी सेवा महापालिकेतर्फे देण्यात येतात. अशाप्रकारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सेवा देत असताना नागरिकांकडूनही त्यास सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार निर्मितीच्या जागी कचरा विलगीकरण करण्याची जबाबदारी संबंधित कचरा निर्माणकर्त्याची आहे. तथापी आपण व्यावसाय करीत असलेल्या ठिकाणी या व्यावसायाद्वारे निर्माण होणार्‍या ओल्या-सुक्या कचर्‍याचे विलगीकरण करुन स्वतंत्ररित्या ठेवणेकरीता व सदरचा कचरा महापालिकेच्या वाहनामध्ये टाकण्याची व्यवस्था केलेली आढळून येत नाही. त्यामुळे आपण सदरचा कचरा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदरची बाब ही नियमांचे उल्लंघन करणारी असल्याने ही नोटीस प्राप्त होताच 24 तासाच्या आत ओला-सुका कचरा स्वतंत्ररित्या गोळा करणे करीता कचरा पेटी (डस्टबीन) ची व्यवस्था करावी व महापालिकेच्या घंटागाडीमध्ये या कचर्‍याची विल्हेवाट लावावी अन्यथा आपणावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आलेला आहे.