महेश पतसंस्थेस दिलेला चेक वटला नाही दोघा कर्जदारांना प्रत्येकी 1 वर्षाची सजा

भिंगार – कर्जदाराने दिलेला चेक वटला नाही म्हणून महेश नागरी सहकारी पतसंस्थेची फसवणूक करणार्‍या दोघा कर्जदारांना न्यायालयाने प्रत्येकी एक वर्षांची सजा सुनावली आहे. अशी माहिती महेश पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी दिली.

यामध्ये नासिरखान गुलाबखान पठाण (रा. नगर) व प्रशांत सुरेश पगारे (रा.सावेडी, नगर) या दोघांनी महेश नागरी सहकारी पतसंस्थेतून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या रक्कम फेडीसाठी नासिरखान पठाण यांनी 96 हजार रुपयांचा चेक दिला होता. तर प्रशांत पगारे यांनी 42 हजार रुपयांचा चेक दिला होता. हे दोन्ही चेक वटले नाही. याबाबत दोघांना नोटीस पाठवून चेक वटले नसल्याची नोटीस दिली. पण या दोघांनी मुदतीत रक्कम भरली नाही. संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला नाही. म्हणून या दोघांविरुध्द नगरच्या न्यायालयात 138 प्रमाणे केस दाखल करण्यात आली होती. याकामी संस्थेचे कर्मचारी कांतीलाल बोरा यांची साक्ष महत्त्वाची ठरली. संजय मुनोत यांनी सहकार्य केले.

याप्रकरणी न्यायमूर्ती ज्ञानेश्वर दंडे यांनी नासिरखान गुलाबखान पठाण याला 1 लाख 10 हजार दंड व 1 वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तर प्रशांत सुरेश पगारे याला 65 हजार रुपये दंड व 1 वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. संस्थेच्यावतीने अॅड. अरविंद काकाणी यांनी कामकाज पाहिले.