महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भल्या पहाटे घेतली दैनंदिन स्वच्छतेची झाडाझडती

रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचे महानगरपालिका प्रशासनास आदेश

अहमदनगर- स्वच्छता सर्व्हेक्षणात नगर शहराला थ्रीस्टार मिळवून देण्यासाठी गेल्या महिनाभरापासून कामाला लागलेल्या महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मंगळवारी (दि.14) भल्या पहाटे शहरात ठिकठिकाणी फिरुन दैनंदिन स्वच्छतेच्या कामाची झाडाझडती घेतली. यावेळी काही ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार आढळून आल्याने त्यांनी या कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

महापालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतलेला असून पहिल्या दोन तिमाहींमध्ये नगर देशातील टॉप 100 शहरांमध्ये आलेलेले आहे. लवकरच यावर्षीचे अंतीम परिक्षण केंद्रीय समिती मार्फत होणार आहे. या परिक्षणामध्ये देशातील पहिल्या 50 शहरांमध्ये नगरचा समावेश व्हावा यासाठी महापौर वाकळे प्रयत्नशील आहेत. नगर शहराला स्वच्छतेत थ्री-स्टार मिळावा यासाठी प्रशासनाबरोबरच महापौर वाकळे अतिशय बारकाईने सर्व प्रक्रियेवर लक्ष देवून आहेत. शहरात सफाई कर्मचार्‍यांमार्फत दररोज साफसफाई केली जाते. या कामात महापालिकेच्या इतर विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनाही सहभाग घेण्याचे आवाहन महापौर वाकळे यांनी केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी महापालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी शहरात ठिक-ठिकाणी स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. महापौर वाकळे यांनी पहाटे पासून शहराच्या विविध भागात फिरत स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. अधिकारी कर्मचार्‍यांना विविध प्रकारच्या सूचना केल्या. तसेच रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. शहर कचरामुक्त करण्यासाठी स्वच्छतेच्या कामाचा आढावा त्यांनी सोमवारी (दि.13) दुपारी घेतला होता. यावेळी सर्व स्वच्छता निरीक्षकांना प्रभागात फिरुन स्वच्छतेबाबत पाहणे करण्याचे आदेश दिले होते. दैनंदिन स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणा-या स्वच्छता निरीक्षक व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याच्याही सूचना दिलेल्या होत्या. शहरात रस्त्यावर माती, बांधकाम साहित्य, कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी तसेच चहाच्या गाड्या, खाद्य पदार्थांच्या गाड्यांसमोर कचरा व घाण पाणी टाकणार्‍यांना नोटीसा देवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. या सुचनांप्रमाणे कामकाज सुरू आहे की नाही याची पाहणी महापौर वकाळे यांनी मंगळवारी पहाटे पासून केली.