‘माऊली’

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदायात ‘माऊली’ उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत, तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावंडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले.

संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुख्मिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्वीकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. आपल्या मुलांवर समाजाने टाकलेला बहिष्कार परत घ्यावा, यासाठी उभयतांनी इंद्रायणीत आपला देहत्याग केला.

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचे तेज लहानपणापासूनच जाणवायचे. त्याकाळी संस्कृत भाषेत असलेले ज्ञान केवळ विशिष्ट वर्गातच सीमित होते, त्यासाठी वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी ’ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे सार सामान्यांसाठी मराठीत लिहिले. त्याव्यतिरिक्त हरिपाठ व पसायदान असे आध्यात्मिक लिखाणही लोकांसाठी केले.

लहानपणी आळंदी येथे वास्तव्यास असताना, ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे माधुकरी मागून जीवन कंठीत असत. एके दिवशी भाक-या थापण्यासाठी खापर कोणी दिले नाही. त्यावेळी छोट्या मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी थापल्या. योगी चांगदेव वाघावर बसून माऊलीकडे निघाले, त्या वेळेला ज्ञानेश्वर त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडांसह अर्धवट बांधलेल्या भिंतीवर बसून चाल करून गेले. कर्मठ पंडितासमोरही ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद बोलून दाखवला. असे अनेक प्रसंग ज्ञानेश्वरांचे मोठेपण आणि दिव्यशक्तीचा प्रत्यय देतात. उभ्या महाराष्ट्राच्या या माऊलींनी केवळ २२ वर्षांचे असताना जिवंत समाधी घेतली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा