सरकारी कामे होण्यासाठी लोकशाही जनसुनवाई घ्यावी

राज्यात शॅडो कॅबिनेट स्थापन करण्यासह भाजपला करणार आग्रह

अहमदनगर- सरकार दप्तरी अडकलेली सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यासाठी सरकार स्थापनेनंतर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात आमदार व प्रतिआमदारांच्या उपस्थितीत लोकशाही जनसुनवाई घेण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्यावतीने करण्यात आली आहे.

सरकार कोणाचेही आले तरी सर्वसामान्य नागरिकांचे सरकार दप्तरी अडलेली कामे होत नाही. सर्वसामान्य नागरिक शासकीय कार्यालयात गेल्यास अधिकारी त्यांना जुमानत नाही. निवेदन व केलेला पाठपुरावा फक्त कागदोपत्री होतो. प्रत्यक्षात कामे मात्र होत नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वसामान्यांची कामे होण्यासाठी विधानसभा मतदार संघात आमदार व दोन नंबरची मते मिळवलेल्या प्रतिआमदारांसह सर्व शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत लोकशाही जनसुनवाई घेतल्यास अनेक प्रलंबीत प्रश्‍ने मार्गी लागणार असल्याचे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कॉन्टम डेमोक्रसीच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिआमदार व शॅडो कॅबिनेट मंत्रीमंडळ स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. तर सर्वसामान्यांची कामे होण्यासाठी लोकशाही जनसुवाई ही संकल्पना मांडण्यात आली आहे. या जनसुनवाईत सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्‍न मांडून लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सरकारी अधिकार्‍यांना ती कामे करुन देण्यास भाग पाडणार असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले आहे. तर प्रतिआमदार म्हणून स्नेहलता कोल्हे, साहेबराव नवले, शिवाजी कर्डिले हे प्रतिआमदाराची शपथ घेण्यास तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाशिव आघाडीद्वारे सत्ता स्थापन केल्यास भाजपने शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा आग्रह संघटना धरणार आहे. यामुळे सर्वसामान्यांची कामे कार्यक्षमतेने होऊन राज्याचा विकास साधला जाणार असल्याची भूमिका संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात लोकशाही जनसुनवाई होण्यासाठी अॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल आदी प्रयत्नशील आहे.