‘लोन ट्रान्स्फर’ ची सुयोग्य वेळ

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करण्यापूर्वीच बहुतांश बँकेने यावर्षी दोनदा धोरणानुसार व्याजदरात कपात केली. त्यामुळे अनेक गृहकर्जधारकांना व्याजदरकपातीची अपेक्षा आहे. असे असूनही काही प्रकरणात तर गृहकर्जाचे व्याजदर वाढले आहेत. यामागे प्रमुख कारण म्हणजे कर्ज रिसेट करण्याच्या तारखेचा नियम. या दिवशी व्याजदर हा एमसीएलआरवर आधारित पुन्हा निश्‍चित होतो. त्यामुळे सध्याचा आणि नवीन गृहकर्जाच्या व्याजदरात तफावत दिसून येते. अशा स्थितीत ग्राहकास होम लोन बॅलेन्स ट्रान्सफर करण्याचा विचार करावा लागतो.

व्याज खर्चात मोठी बचत

बहुतांश ग्राहक हे गृहकर्जाच्या व्याजात कपात व्हावी यासाठी गृहकर्ज ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतात. मात्र कमी व्याजदर असलेल्या बँक किंवा वित्तिय संस्थेंकडे अर्ज करताना संबंधित बँक ही नवीन अर्जदार म्हणूनच आपल्याकडे पाहते. परिणामी आपल्याला प्रोसेसिंग ङ्गी आणि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह शुल्क देखील आकारले जावू शकते. अशा स्थितीत बॅलेन्स ट्रान्सफर झाल्यानंतर होणार्‍या बचतीचा विचार करताना या खर्चाचा देखील समावेश करायला हवा. जर आपल्याला मोठी बचत मिळत असेल तरच बॅलेन्स ट्रान्सफरचा विचार करायला हवा. जर फारसा फायदा होत नसेल तर सध्याची बँक सुरू ठेवावी आणि त्यांच्याशी व्याजदर कपातीबाबत चर्चा करावी. अन्यथा आगीतून फुगाट्यात अशी अवस्था होईल.

एमसीएलआरमध्ये स्वीच करणे

आरबीआयने 1 एप्रिल 2016 पासून बँकांना मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेडिंग रेट (एमसीएलआर) वर आधारित गृहकर्ज आकारण्याचे आदेश दिले आहेत. बिगर वित्तिय कंपनी किंवा हौसिंग फायनान्स कंपन्यांना प्राइम लेडिंग रेट (पीएलआर) आधारित व्याजदर आकारण्याचे सांगण्यात आले. या तुलनेत एमसीएलआर प्रणालीत पारदशर्कता आहेच त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना दिला जातो. एमसीएलआरच्या व्यवस्थेत प्री-सेट लोनची रिसेट तारिख निश्‍चित असल्याने सध्याचा व्याजदर हा पुढच्या रिसेट तारखेपर्यंत बदलता येत नाही. यादरम्यान बँकेच्या व्याजदरात चढउतार झाले असले तरी ग्राहकांच्या व्याजदरात बदल करता येत नाही. म्हणून पीएलआर व्यवस्थेत कर्जाची परतफेड करणार्‍या ग्राहकाने एमसीएलआरमध्ये कर्ज रुपांतरीत करणे संयुक्तिक ठरेल.

टॉप अपची गरज

गृहकर्जधारकांना नेहमीच अतिरिक्त पैशाची गरज भासते. त्यासाठी गरजू ग्राहक बँकेकडून होम लोन टॉप अप करण्याचा आग्रह करतात. काहीवेळा टॉप अप लोनला मंजुरी मिळत नाही. कारण सर्वच बँकात अशा प्रकारची सुविधा असते असे नाही. म्हणूनच टॉप अप लोनची गरज भागवण्यासाठी बॅलेन्स ट्रान्सफरची सुविधा घेऊ शकता. याशिवाय सध्याच्या बँकेने मंजूर केलेली टॉप अपची रक्कम ही मागणीपेक्षा कमी असेल आणि एखादी बँक आपल्याला गरजेनुसार टॉप अप लोन बहाल करत असेल तर तेव्हाही बॅलेन्स ट्रान्सफरची प्रक्रिया अवलंबण्यास हरकत नाही. अनेक बँकांनी होम लोन बॅलेन्स ट्रान्सफरबरोबरच टॉप अप लोनची सुविधा देखील दिली आहे.

चांगल्या नियम आणि अटींसाठी

सध्याची गृहकर्जाची बँक ही कर्जाच्ंया नियमात बदल करण्यास नकार देत असेल म्हणजेच व्याज दर कमी करणे, रिसेटचा कालावधी आणि कर्जाच्या कालावधीत बदल करणे या गोष्टी मानण्यास नकार देत असेल तर बँक बदलण्याचा निर्णय घ्यावा. जर एखादी बँक चांगली सेवा आणि अटी देत नसतील आणि बँक सेवेमुळे आपण त्रस्त झाला असाल तर बॅलेन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडावा. मात्र कर्ज स्थानांतर करण्यापूर्वी नव्या बँकेच्या अटी आणि नियम हे चांगल्यारितीने समजून घ्याव्यात. बॅलेन्स ट्रान्सफरचा उपयोग हा कर्जाचा कालावधी कमी करण्यासाठी, व्याजदर कमी होण्यासाठी किंवा टॉप अप लोनसाठी होत आहे की नाही, हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा