नुतनीकरणाच्या कामानंतर केडगावातील ‘लिंक रोड’वर ठेकेदाराने टाकल्या ‘काट्या’

विद्यार्थी, नागरिकांच्या जीवाला अपघाताचा धोका; रहदारीला मोठा अडथळा

अहमदनगर- पुणे महामार्ग ते कल्याण रस्त्याला केडगावमधून जोडणार्‍या लिंक रोडच्या नुतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तथापी रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर ठेकेदाराने या रस्त्यावर अनेक ठिकाणी बाभळीची झाडे तोडून काट्या टाकल्या असल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या जिवीताची कोणतीही काळजी न घेता ठेकेदाराने टाकलेल्या काट्या प्रवासात जिवघेण्या ठरत आहेत.

केडगावमधील लिंक रोडची मोठी दुरावस्था झाली होती त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम हाती घेऊन संबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिलेले आहेत. त्यानुसार ठेकेदाराने सदर रस्त्याचे काम सुरू केले आहे. परंतु रस्त्याचे काम करताना प्रवाशांच्या जिवीताची काळजी घेण्याबाबत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहित. विशेष म्हणजे ठेकेदाराने नागरिक, प्रवाशांच्या जिवाची काळजी घेण्याऐवजी त्यांना धोका होईल. अपघाताच्या घटना घडतील अशाच उपाययोजना केल्याचे समोर आले आहे.

सदर लिंक रस्त्यावर जवळपास तीनहून अधिक शाळा आहेत. तसेच परिसरात उच्चभ्रू लोकांचे वास्तव्य आहे. या रस्त्यावरुन वाहनांची तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, रिक्षा यांचा या रस्त्यावरुन मोठा वावर आहे. अत्यंत वर्दळीचा असा हा लिंक रस्ता आहे. असे असताना सदर रस्त्याचे काम झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने गुरुवारी सायंकाळी या रस्त्यावर जागोजागी काट्याची झाडे टाकली आहेत. या काट्या संपूर्ण रस्त्यावर विखुरलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक, नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

ठेकेदाराने बॅरिकेट टाकण्याऐवजी काट्या टाकल्या असून रस्त्यावर कुठेही रिफ्लेक्टर नाहीत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधार असतो. त्यामुळे नागरिकांना वाहने चालविताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काट्यात अडकून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांच्या जिवाशी खेळण्याचाच हा प्रकार असून त्याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.