चुकीच्या वीज बिलातून ग्राहकांवर लादलेल्या दंड आणि व्याजाची एजन्सीकडून वसुली करा

चूक एजन्सीची अन् भुर्दंड ग्राहकांना का? शिवसेनाप्रणित युवासेनेचा आंदोलना इशारा

अहमदनगर- शहरातील वीज बिल वाटपात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ झालेला असून मार्चपासूनची वीजबिले दंड आणि व्याज लावून सहा महिन्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ग्राहकांना देण्यात आली आहेत. डिजिटल रिडिंग न घेता अंदाजे मीटर रिडींग टाकून ही बिले देण्यात आल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी अंदाजे मीटर रिडींगद्वारे वीजबिले देणार्‍या एजन्सीला समज देऊन ग्राहकांना सोसावा लागलेला दंड आणि व्याज एजन्सीकडून वसूल करावे अन्यथा महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनाप्रणित युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले.

विशेष बाब म्हणजे वीज बिल वाटपाबरोबरच वीज मीटरची रिडींग घेण्याच्या प्रकारातही सावळा गोंधळ होत आहे. अनेकांना अंदाजे रिडींगच्या आधारे अव्वाच्या सव्वा वीजबिल देण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे. महावितरण कार्यालयात वारंवार तक्रार करुनही महावितरणने संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उशिरा वीज बिल मिळाल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक दंड सोसावा लागत आहे.

नगर शहर व परिसरात घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वीज जोडण्या आहेत. मीटरची रिडींग घेण्याचे व बिल वाटप करण्याचे कंत्राट महावितरणने खाजगी एजन्सीला देण्यात आले. एजन्सीने मीटर रिडींग घेण्यासाठी व बिल वाटपासाठी काही जणांची नियुक्तीही केली. घरोघरी जाऊन मीटरची रिडींग घेण्याऐवजी अंदाजे रिडींग नोंदवणे, अंदाजे नोंदविण्यात आलेल्या रिडींगच्या आधारे वीजबील देणे, दर महिन्याला बिल वाटप करणे आवश्यक असतानाही दोनतीन महिन्यांचे वीजबील एकत्र देणे असे प्रकार या एजन्सीकडून सध्या सुरु आहे. अंदाजे रिडींग असल्याने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बील देण्याचा प्रकार वारंवार होत आहे. याविषयी महावितरण कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रारदार नागरिक आलेले बिल कमी करण्यासाठी दररोज महावितरण कार्यालयात चकरा मारताना दिसतात. याप्रमाणे गणित मांडल्यास नगर शहर व परिसरातील वीजग्राहकांना कोणतीही चूक नसताना लाखो रुपयांचा दंड केवळ या गलथानपणामुळे भरावा लागणार आहे. मागील तीन महिन्यांपासून वीजबील प्राप्त न झाल्याने ग्राहकांनी याविषयी महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारीही केल्या, मात्र अद्यापही याबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

बिलाच्या रकमेला चक्रवाढ व्याज

शहरातील अनेक ग्राहकांना मागील तीन महिन्यांपासून वीजबिलांचे वाटपच करण्यात आलेले नाही. वीजबिल भरण्यास उशिर झाल्यास त्यावर दंड आकारण्यात येतो व जसाजसा उशीर होईल त्यावर चक्रवाढ व्याज दराने वीजबिलाची रक्कम वाढत जाते. फक्त घरगुतीच नव्हे तर वाणिज्य वापराच्या ग्राहकांनाही फेब्रुवारी महिन्याचे बिल आल्यानंतर थेट जुलै महिन्याचे बिल वितरीत केले गेले आहे. हे भरमसाठ वीजबिल पाहून अनेक ग्राहकांचे डोके चक्रावून गेले आहे.

ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने अंदाजे बिल देण्याचे प्रकार वारंवार घडत असून ग्राहकांना दंड व व्याजासह ही बिले भरावी लागत आहेत. सदर दंड व व्याजाची रक्कम संबंधित एजन्सीकडून वसूल करावी. आठ दिवसात महावितरणने याबाबत योग्यती कारवाई करावी अन्यथा अधीक्षक अभियंत्याच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी दिला आहे.