उत्तम जीवनशैली कर्करोगास परावृत्त करेल – डॉ. अविनाश सावजी

 

सी.एस.आर.डी.मध्ये आरोग्य व कॅन्सर विषयावर व्याख्यान

अहमदनगर – सी.एस.आर.डी. समाजकार्य व संशोधन संस्थेत संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर सेंटर अहमदनगर यांच्या सहकार्याने, जीवनशैली आरोग्य व कॅन्सर या विषयांवर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रयास संस्थेचे संस्थापक व जेष्ठ समाजसेवक डॉ. अविनाश सावजी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी उत्तम जीवनशैली, योग्य आहार व व्यायामाचे महत्व पटवून दिले. कर्करोगाविषयी बोलताना डॉ. अविनाश सावजी म्हणाले कि, समाजामध्ये कर्करोगामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग तर पुरुषांमध्ये घशाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि याला जबाबदार असणारे घटक म्हणजे बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आणि अपौष्टिक आहार हे सर्व घटक कर्करोगासारख्या असाध्य आजारांना आमंत्रित करतात.

म्हणून पूर्ण समाजामध्ये या रोगाविरुद्ध लढण्यासाठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे. रुग्णांना धीर देण्यासाठी योग्य समुपदेशन व सहाय्यता गटाची निर्मिती करणे आवश्यक आहे. अनेक प्रेरणादाई उदाहरणे त्यांनी मुलांसमोर मांडले.

प्रास्तविक प्रा. सुरेश मुगुटमल यांनी केले. याप्रसंगी प्रा. आसावरी झपके, प्रा. जयमोन वर्गीस, प्रा. विजय संसारे, प्रा. प्रज्ञा जाधव, प्रा. प्रदीप जारे आरंभ फाऊंडेशनचे सचिव प्रदीप काकडे, विश्वस्त चांद शेख, खजिनदार गणेश भोसले सह इतरांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपेंदर कौर हिने केल तर कार्यक्रमाचे आभार प्रा. विजय संसारे यांनी केले.