टोळधाडीचा मुंबईसह कोकणाला धोका नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार – केंद्रीय कृषी मंत्रालयाचा खुलासा

सोशल नेटवर्किंगवर चर्चांना उधाण

मुंबई – राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीने शिरकाव केला आहे. परिणामी लाखो हेक्टर शेतीला याचा फटका बसत आहे. दुसरीकडे ही टोळधाड मुंबईत धडकणार असल्याच्या अफवा सोशल मीडियातून पसरत आहे. आधीच देशात सर्वाधिक ‘कोरोना’ रुग्णांची संख्या मुंबईत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात आता हे नवीन संकट काय आहे, म्हणून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मात्र, मुंबईच्या नावाने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ नंतर महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. हे व्हिडीओ आणि मॅसेज मुंबईचे नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मुंबईला टोळधाडीचा कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या आपातकालीन विभागाने ही माहिती दिली आहे. तसेच खोटे मेसेज फॉरव्हर्ड करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याने प्रशासनाने सांगितले आहे. मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या टोळधाडी संदर्भात माहिती देणाऱ्या द लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (एलडब्लूओ) मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्याचे कृषी आय़ुक्त सुहास दिवस यांनी मुंबईकरांसाठी टोळधाडीसंदर्भात कोणताही इशारा देण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ऐन खरीपाच्या तोंडावर आधीच ‘कोरोना’ची चिंता त्यात या टोळधाडीला सामोरे  जाण्याचे आव्हान राज्य आणि केंद्र सरकार समोर आहे. अन्न आणि शेती कृषी संघटना या टोळधाडीबाबत महत्वाची माहिती गोळा करत असते. तसेच सर्व देशांना सावध करत असते. टोळधाडीबाबत सहा आठवडे आधीच संबंधित देशांना इशारा दिला जातो.

भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे बुधवारी रात्री टोळधाड होती. तेथून गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास नदी ओलांडून तिने मध्यप्रदेशात प्रवेश केला आहे. मुंबईला टोळधाडसंदर्भात कोणताही इशारा दिलेला नाही. सध्या फिरत असलेली माहिती या अफवा आहेत. अशी माहिती दिवस यांनी दिली. कृषी खात्यातील कर्मचारी याबाबत दक्ष असून टोळधाडीच्या मागावर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

टोळधाडी महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांपुरत्या मर्यादित आहेत. खास करुन विदर्भातील काही जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशमधून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हे टोळ महाराष्ट्राच्या पूर्वभागांमधील काही जिल्ह्यांमध्ये आले आहेत, असं एएलओचे उपसंचालक के. एल. गुजजार यांनी सांगिले आहे.

रविवारी मध्यप्रदेश व राजस्थानातून महाराष्ट्रात कीटकांचा झुंड (टोळधाड) धडकला. सर्वात आधी नागपूर जिल्ह्य़ातील काटोल तालुक्यात कीटकांनी पिकांवर हल्ला केला. फेटरी, खानगाव शिवारासह आमनेर गांदी या परिसरात टोळ आढळून आले. यात  पिकांचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी दुपारच्या सुमारास हे टोळ भंडादरा जिल्ह्यामधील मोहाडी आणि तुमसार तहसीलमधील गावांमध्ये अढळून आल्याचे वृत्त आहे.

टोळधाडी बद्दल माहिती

  • सहसा जून जुलैमध्ये वाळवंटातून टोळधाड भारतात घुसते. यंदा मात्र महिना दिड महिना आधीच आक्रमण केले आहे.
  • सध्या टोळ जिथे अंडी घालतात त्या ठिकाणी फवारणी केली जात असली तरी प्रादुर्भाव वाढला तर विमानातून किंवा ड्रोनने फवारणी करण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो.
  • सध्या पश्चिम आफ्रिकेच्या काही भागात, केनिया, सोमालिया, इथिओपिया, सुदान, दक्षिण इराण आणि नैऋत्य पाकिस्तानात जास्त प्रादुर्भाव आहे.
  • लोकस्ट (Locusts) म्हणजेच टोळधाड काही भागात नाकतोडे अशीही ओळख.
  • सूर्यादया पासून ते सूर्यास्ता पर्यंत टोळ आधाशीपणे पिकांवर तुटून पडतात.
  • भारताच्या इतिहासात मोठ्या नुकसान करणाऱ्या १० टोळधाडींची नोंद आहे.
  • साधारण ३५ हजार नागरिक किंवा २० उंट किंवा ६ हत्ती एका दिवसात खाऊ शकतील एवढं पीक ही टोळ धाड (अंदाजे ४ कोटी) फस्त करु शकते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा