28 वर्षानंतर भेटले बालमित्र…. बालस्मृतींना उजाळा देत जपली सामाजिक बांधिलकी…

अहमदनगर- पिंपळगाव रोठा, (ता.पारनेर) येथे इ. 1 ली, 1981-82 जि.प.प्रा.शाळा व इ.10 वी 1990-91 श्री खंडेश्‍वर विद्यालय पिंपळगाव रोठा, या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 28 वर्षांनी बाल स्मृतीगंध स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. लहानपणातील बालमित्र व शिक्षक या मेळाव्यास उपस्थित होते. या बॅचमधील विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करुन भाविकांसाठी व ग्रामीण भागातील गरजूंना मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचेही आयोजन केले होते.

बाल स्मृतीगंध स्नेह मेळाव्याची सुरुवात इतनी शक्ती हमे देना दाता… या प्रार्थनेने झाले. या कार्यक़्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तत्कालीन शिक्षक सिताराम गायकवाड यांनी अध्यक्षस्थान भुषविले. याप्रसंगी दशरथ लोंढे गुरुजी, गायकवाड बाई, अमृता फापाळे गुरुजी, अनंत गुरुजी, आप्पासाहेब झावरे गुरुजी, बाबाजी चाहेर सर, सुनिल शिंदे सर, काशिनाथ औटी सर, सुभाष लोंढे सर, भानुदास धुमाळ सर, श्री.म्हस्के सर, धोंडीभाऊ देंगडे सर यांनी मनोगतात त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानदेव सुंबरे, संतोष जाधव, तुळसा शिंदे, जालिंदर खोसे, शहाजी शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी औटी सर म्हणाले, त्याकाळी कुठल्याही प्रकारचा पगार नसतांना आम्ही जे ज्ञानदानाचे काम केले; त्या ज्ञानदानाची पावती आज 28 वर्षांनंतर मिळत आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास त्याचे फळ चांगले मिळते. त्यावेळचे खोडकर विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी झाल्याचे पाहून आनंद होत आहे. या स्नेहमेळाव्याने आम्हाला त्या काळचे बालरुप विद्यार्थी डोळ्यासमोर येत आहे. विद्यार्थ्यांनी 28 वर्षांनंतर आपला सन्मान केल्याने आम्ही सर्व शिक्षक भावूक झालो असल्याचे सांगितले.

यावेळी अप्पासाहेब झावरे गुरुजी म्हणाले, नोकरीची सुरुवात याच गावातून झाली आणि याच गावातून मी निवृत्त झालो. या गावाने आणि विद्यार्थ्यांनी मोठे सहकार्य केले त्यामुळे या गावाशी जीवाभावाचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. विद्यार्थ्यांना कौटुंबिक, सामाजिक बांधिलीकी जपण्याचा सल्ला दिला. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती… या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांचा हा अनमोल ठेवा आमच्या मनात कायमस्वरुप राहील.

याप्रसंगी ज्या विद्यार्थीनी विधवा झाल्या, त्यांना भाऊबीज-दिपावली भेट देण्यात आली. तसेच कै.लक्ष्मण किसन गायकवाड या नुकत्याच निधन झालेल्या माजी विद्यार्थीची कुटूंबातील परिस्थती हालाखीची असल्याने मुलांच्या भविष्यासाठी या सर्व वर्गमित्रांनी 55,000 /- हजारांची भरीव मदत दिली. याप्रसंगी वर्गमित्र माजी सैनिक शिवाजी भांबरे, अण्णा घुले, सुरेश सुपेकर यांचाही सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या गुणवंत मुलांचा सिताराम गायकवाड यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गुणगौरव केला.

याप्रसंगी संगीता बनकर, संगीता दाते, भामा पुंडे, दिलीप घोडके, बाळासाहेब पुंडे, कैलास घुले, खंडू फापाळे, धोंडिभाऊ जगताप, संतोष सुपेकर, जालिंदर जगताप, ज्ञानदेव जगताप, चंद्रकांत कुसळकर, सुखदेव घुले आदिंसह अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सुरेखा गागरे यांनी मानले.