नवरात्र उत्सवात केडगाव देवी मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य

भाविकांना सुविधा देण्यास महापालिकेची यंत्रणा ठरली कुचकामी; भाविकांमध्ये तीव्र नाराजी

अहमदनगर- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी केडगाव देवीचा नवरात्रउत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतु यावर्षी महानगरपालिका प्रशासन भाविकांना चांगल्या सुविधा देण्यास पूर्णपणे कुचकामी ठरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांनी केला आहे.

याठिकाणी छोटे-मोठे व्यवसायिक आपला उद्योग व्यवसाय करण्यासाठी येथे येत असतात. महानगरपालिका प्रशासनाकडून कचराकुंडी उपलब्ध नसल्यामुळे व देवी परिसरात कचरा संकलन करणारी घंटागाडी येत नसल्यामुळे परिणामी व्यवसायिकांना कचरा रस्त्याच्या कडेला टाकावा लागत आहे. हा टाकलेला कचरा महानगरपालिका प्रशासनाकडून रोजच्या रोज उचलला जात नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे भाविकांमध्ये व स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून याठिकाणी नवरात्र उत्सवासाठी पूर्णवेळ एक अग्निशमन दलाचा बंब उपलब्ध होणे गरजेचे होते. परंतु त्याचीही व्यवस्था महानगरपालिकेकडून झालेली नाही.

त्यातच केडगावचा अग्निशमन विभाग बंद आहे. तसेच केडगाव देवी मार्गावरील काहीठिकाणी पथदिवे ही बंद पडलेली आहेत त्याच्याकडेही मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यासर्व बाबींची माहिती आयुक्त यांना देऊन केडगाव विभागातील कामचुकार अधिकारी व कर्मचार्‍यांची तक्रार करणार असल्याची माहिती यावेळी वैभव कदम दिली आहे.

महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामातील दिरंगाईचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याची टीका यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम केली आहे.