ज्योतिर्लिंग

भारतातील प्रख्यात बारा शिवस्थाने ज्योतिर्लिंगे म्हणून ओळखली जातात. या बारा ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपाबाबत व उत्पत्तीबाबत अभ्यासकांत विविध मतमतांतरे आढळतात. ज्योतिर्लिंगातील शाळुंका या यज्ञवेदींची आणि लिंगे ही यज्ञशिखांची प्रतीके बारा आदित्यांची प्रतीके, एकाच शिवलिंगाचे बारा विविध ठिकाणी पडलेले खंड व्यापक ब्रह्मात्मलिंग किंवा व्यापक प्रकाश सुप्तावस्थेत असलेली ज्वालामुखीची उद्रेकस्थाने आदी उपपत्ती अभ्यासकांनी ज्योतिर्लिंगांबाबत मांडलेल्या आहेत.

भारताच्या पवित्र सागरकिनारी, नदीतिरी, पर्वत शिखरावर अगर पायथ्याशी, निसर्गरम्य स्थानी ही शिवस्थाने विराजमान आहेत. या ज्योतिर्लिंगांबाबत स्थानमाहात्म्य सांगणा-या वेगवेगळ्या पौराणिक कथा असल्या, तरी त्यांचा भर शिवमाहात्म्य सांगण्यावर, तसेच पार्वतीच्या तपाने साक्षात शिवच त्या त्या स्थानी प्रगट झाला, हे सांगण्यावर असल्याचे सामान्यत: दिसून येते.

भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेची जडणघडण करणारी ही ज्योतिर्लिंगे भारतात आसेतुहिमाचल विखुरलेली आहेत. ती हिंदूंची पवित्र पुण्य क्षेत्रे मानली जातात. दरवर्षी लाखो भाविक या स्थानांच्या यात्रा करून कृतकृत्य होतात. या बारा ज्योतिर्लिंगांची नावे आणि स्थाने शिवपुराणात आलेली आहेत. यातील काही नावांच्या स्थानांबाबत विकल्पही आढळतो.

ही नावे पुढीलप्रमाणे –

सोमनाथ – सौराष्ट्रात वेरावळजवळ

मल्लिकार्जुन – आंध्र प्रदेशात श्रीशैलम पर्वतावर

महाकालेश्वर – उज्जैन

ओंकार वा अमलेश्वर – नर्मदातिरी ओंकारमांधाता

केदारनाथ – हिमालयात केदारपुरी

भीमाशंकर – डाकिनी क्षेत्र, खेड तालुका, पुणे जिल्हा

विश्वेश्वर – काशी

त्र्यंबकेश्वर – नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर

वैद्यनाथ वा वैजनाथ – परळी, बीड जिल्हा

नागनाथ – औंढा, परभणी जिल्हा

रामेश्वर – सेतुबंधाजवळ रामेश्वर

घृष्णेश्वर – वेरूळ, औरंगाबाद जिल्हा

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा