जॉगिंग ट्रॅकचे मैदान व्यावसायिक कारणासाठी भाड्याने देणे बंद; महापालिकेत ठराव मंजूर

अहमदनगर- सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी जवळील जॉगींग ट्रॅकचे मैदान मोजके तीन-चार धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम वगळता इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी भाड्याने न देण्याचा ठराव बुधवारी (दि.14) दुपारी महापालिकेच्या सभेत करण्यात आला.

महापालिकेची महासभा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता सुरू झाली. या सभेत सावेडी जॉगींग ट्रॅकचे मैदान भाड्याने न देण्याबाबतचा विषय चर्चेसाठी होता. या विषयावर नगरसेवक महेंद्र गंधे, मनोज दुलम यांच्यासह या परिसरातील नगरसेवकांनी नागरिक व खेळाडुंच्या भावना सभागृहापुढे मांडल्या. सदरचे मैदान हे प्राथमिक शाळा व खेळाच्या कारणासाठी आरक्षीत असल्याने तसेच व्यावसायिक वापरासाठी ते भाड्याने दिल्यावर मैदानाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा होत आहे. त्याचा त्रास खेळाडू, शालेय विद्यार्थी, मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक यांना होत असल्याने हे मैदान व्यावसायिक कारणासाठी भाड्याने देण्यात येवू नये अशी मागणी सर्वच नगरसेवकांनी यावेळी केली. याबाबत निर्णय देताना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यापुढे सदर मैदान कोणतेही व्यावसायिक कारणासाठी भाड्याने दिले जाणार नाही. शहरात वर्षभरात मोठ्या स्वरुपात साजर्‍या होणार्‍या तीन-चार सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसाठीच हे मैदान उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी विविध अटी व शर्ती लावण्यात येतील व त्यांची अंमलबजावणी संयोजकांकडून करुन घेतली जाईल असे स्पष्ट केले.

भूसंपादनाचा विषय शासनाकडे पाठवणार

उपनगरातील तपोवन रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करण्याबाबतचा विषय सभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. या विषयावर या भागातील नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, दीपाली बारस्कर, रुपाली वारे, विनीत पाऊलबुधे यांनी आक्षेप घेत सदरची जागा ही महापालिकेच्या मालकीची नाहीच ती जिल्हा परिषदेच्या मालकीची असल्याने भूसंपादनाचे पैसे महापालिकेने का द्यायचे? असा सवाल उपस्थित केला. सदर विषय शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी केली. नगरसेवक मनोज कोतकर यांनीही ज्या व्यक्तीचा तपोवन रोडच्या कामासाठी जागेच्या भूसंपादनाचा आग्रह आहे त्याच व्यक्तीची केडगाव देवी रोड येथेही जागा असून तेथील काम रखडलेले आहे. सदर व्यक्ती जाणीवपूर्वक असे प्रकार करत आहे काय? याबाबत शंका व्यक्त केली तसेच हा विषय शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. त्यावर सदर विषय शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा