ड जीवनसत्व आणि नैराश्य

‘ड’ जीवनसत्त्व हे केवळ हाडांच्या आरोग्यासाठीच उपयुक्त आहे, असे नाही. त्यांच्या अभावी वयस्कर लोकांमध्ये नैराश्याचा धोकाही वाढतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. आरोग्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक आहे. कोवळे ऊन तसेच मशरूम (आळिंबी), मासे वगैरे आहारातून ते मिळत असते. त्याची कमतरता असल्यास अनेक समस्या निर्माण होतात.

आयर्लंडमधील डबलिन युनिव्हर्सिटीमध्ये अशी कमतरता निर्माण झाल्यास मानवी शरीरावर कोणते परिणाम होतात याबाबतचे संशोधन करण्यात आले. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा 75 टक्के संबंध नैराश्याशी असल्याचे आढळून आले. 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे चार हजार लोकांवर हे महत्त्वाचे संशोधन करण्यात आले. ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होण्याबरोबरच अन्यही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात असे संशोधकांनी सांगितले.