कर्तव्यतत्त्पर पोलिसांमुळेच उत्सवाचा आनंद व्दिगुणित होतो – शैलेश मुनोत 

अहमदनगर – नगर शहराला गणेशोत्सव तसेच मोहरमची मोठी परंपरा आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे उत्सव एकाच कालावधीत येत असून सर्व नगरकर अतिशय शांततेत आणि उत्साहात या उत्सवांचा आनंद घेत आहेत. नगरकरांनी निर्माण केलेला हा सौहार्द कौतुकास्पद आहे. याशिवाय या उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाने अहोरात्र खडा पहारा दिला. सर्वांशी सुसंवाद साधत पोलिस दलातील सर्वच अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. पोलिस हे खर्‍या अर्थाने समाजाचे रक्षणकर्ते व मित्र आहेत. त्यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे समाजातील सर्वांना सण उत्सवाचा खराखुरा आनंद घेता येतो, असे प्रतिपादन जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी केले.

नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे स्वागत करण्यात आले तसेच मंडळाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळातर्फे शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके तसेच बंदोबस्तावर तैनात पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचेही स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी सेक्रेटरी कुंतीलाल राका, अभय लोढा, अजित गांधी, प्रमेद डागा, मनोज गुंदेचा, संजय ओस्तवाल, विनोद भंडारी, हेमंत मुथा, सत्येन मुथा, राहूल सावदेकर, अमित गांधी, मनोज बोरा, मनिष गुगळे, सचिन कोठारी, राज मुनोत, सुरेश गांधी, योगेश मुनोत आदी उपस्थित होते.

जय आनंद मंडळाने सालाबादप्रमाणे नवीपेठ येथे ग्रामदैवत विशाल गणपतीच्या रथाचे स्वागत करून आरती केली. यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व गणपती मंडळांचेही स्वागत करण्यात आले.