जशास तसे!

एकदा बादशहाकडे गुलनार बेगम नावाची स्त्री रडत ओरडत गेली व छाती बडवून घेत म्हणाली, ‘खाविंद, रहम करो, मला न्याय हवा’ तिचा आक्रोश पाहून सगळा दरबार स्तंभित झाला. या स्त्रीवर असा कोणता दुर्धर प्रसंग ओढवला असावा याबद्दल ते विचार करू लागले.

बादशहाने विचारले, ‘दीदी, काय घडले ते सांगितलेस तर मी न्याय देईन. तू तुझे रडणे थांबव आणि नीट काय ते सांग. ‘खाविंद माझ्या नवर्‍याचे नाव इब्राहिम होते. तो गावातील पाराखाली बसला असताना, झाडावर फांद्या तोडणारा इस्माईल नावाचा माणूस त्याच्या अंगावर पडला. त्यामुळे मान मोडून माझा नवरा मेला.’ गुलनार बेगम म्हणाली. ‘अरेरे! फारच वाईट झालं.’ बादशहानं खेद प्रकट केला व म्हणाला, ‘मी पाच हजार देणार नुकसान भरपाई म्हणून तुला देण्यास त्या इस्माईलला सांगतो.’ ‘छे! छे!! हा न्याय मला अजिबात पसंत नाही. तो इस्माईल मेला तरच माझ्या जिवाला शांती लाभेल.’ ‘अगं, त्याने तरी मुद्दाम केले असेल असे वाटत नाही. वरून पडण्यात त्याच्याही जिवाला धोका होताच ना?’ ‘ते काही मला सांगू नका. इस्माईल मेला पाहिजे. मला नुकसान भरपाई नको.’ गुलनार बेगम म्हणाली. ‘मग माझा न्याय ऐक! तो इस्माईल त्या झाडाखाली बसेल. तू त्या झाडावरून अशी पड की, त्या इस्माईलची मान मोडली पाहिजे. जर त्याची मान मोडली नाही तर-’ बादशहा बोलायचा थांबला. ‘तर?’ सगळेच बादशहाकडे टकमका पाहू लागले. ‘समजले मला मी जाते. हा काय न्याय झाला?’ अशी बडबडत गुलनार बेगम निघून गेली आणि दरबारातला तणाव संपला. ‘आजी किती छान गोष्ट!’ मनोज म्हणाला. ‘तर काय गं आजी?’ दीपाच्या प्रश्‍नावर सगळेच हसू लागले.