विश्वसनीय कारभारामुळे जैन ओसवाल पतसंस्था अनेकांसाठी हक्काचा आर्थिक आधार – नगरसेविका मीनाताई चोपडा 

सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेतर्फे चार चाकी वाहन कर्ज वितरण

अहमदनगर – सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांच्या आदर्श विचारांवर कार्यरत असलेली जैन ओसवाल पतसंस्था सर्वांसाठी हक्काचा आर्थिक आधार असून संस्थेच्या योजना ग्राहकांना आकर्षित करणार्‍या आहेत. अर्थसेवेतून लोकसेवा हे ब्रिद संस्थेने आपल्या कार्यातून सार्थ ठरवले आहे. त्यामुळे संस्थेचा नावलौकिक कायम वृध्दिंगत होत आहे. येणार्‍या काळात या संस्थेचे रुपांतर बँकेत झालेले पहायला मिळेल, असे प्रतिपादन नगरसेविका मीनाताई संजय चोपडा यांनी केले.

सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्या मार्केटयार्ड शाखेच्यावतीने नुकतेच चारचाकी वाहन कर्ज मंजूर करण्यात आले. नगरसेविका सौ. चोपडा यांच्या हस्ते वाहनाच्या चाव्या कर्जदारास सुपुर्द करण्यात आल्या. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मनोज गुंदेचा, व्हा.चेअरमन ईश्वर बोरा, संचालक समीर बोरा, संतोष गांधी, किरण शिंगी, शैलेश गांधी, शांतीलाल गुगळे, सुवर्णा डागा, लताताई कांबळे, पंडीतराव खरपुडे, विनय भांड, सी.ए.विशाल गांधी, सी.ए.संकेत पोखरणा, शाखा व्यवस्थापक मनोज लुणिया आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेविका मिनाताई चोपडा यांचा महापालिकेतील विजयाबद्दल संचालिका सुवर्णा डागा यांनी संस्थेतर्फे सत्कार केला.

चेअरमन मनोज गुंदेचा म्हणाले की, महिला नगरसेवक म्हणुन मीनाताई चोपडा यांची झालेली निवड कौतुकास्पद आहे. त्या महानगरपालिकेच्या कामातून निश्चितच आपल्या कामाचा ठसा उमटवतील. जैन ओसवाल पतसंस्थेने विश्वसनीयता व पारदर्शक कारभारामुळे चाळीस कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केला असून 50 कोटींच्या ठेवींची मजल मारण्याकडे संस्थेची वाटचाल वेगाने सुरु आहे. संस्थेकडून कमी वेळेत, कमी व्याजदरात अधिक कर्ज मंजुरी देण्यात येते. यात प्रामुख्याने दुचाकी वाहन कर्ज, चार चाकी वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, व्यापार्‍यांच्या व्यवसाय वृध्दीला पोषक ठरणारे वेअर हाऊस तारण कर्ज संस्थेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. सोनेतारण कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी आकारण्यात येत नाही. चांगल्या योजनांमुळे अधिकाधिक ग्राहक पतसंस्थेकडे आकर्षित होत असल्याचे गुंदेचा यांनी सांगितले.

व्हा.चेअरमन ईश्वर बोरा म्हणाले की, संस्था कोअर बँकींगचा अवलंब करीत सर्व शाखांमधून ग्राहकांना व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय आधुनिक काळानुसार संस्थेचे स्वत:चे मोबाईल अॅप विकसित करण्यात येणार असून याव्दारे आयएमपीएस, फंडस ट्रान्सफरसारख्या सेवांचा लाभ ग्राहकांना मिळेल. लवकरच संस्थेचे स्वत:चे एटीएम डेबिट कार्डही खातेदारांना उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्न आहे. त्यामुळे ग्राहकांना भारतात कुठूनही आपल्या खात्यात डेबिट कार्डव्दारे पैसे जमा करता येतील तसेच पैसे काढण्याचीही सुविधा उपलब्ध होईल.

व्यापारी, व्यावसायिकांच्या सोयीसाठी संस्थेच्या शहाजी रोडवरील मुख्य शाखेसह मार्केटयार्ड येथील शाखेत जी.एस.टी.चलन, आयकर भरणा चलन तसेच अन्य सरकारी चलने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना चांगली सेवा मिळत आहे.

संस्थेच्या आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी. या सुविधांचा अनेकांना चांगला लाभ होत आहे. या कार्यक्रमास संस्थेचे सभासद, मार्केटयार्ड परिसरातील व्यापारी, खातेदार उपस्थित होते.