जागूमलची हुशारी

रात्री जेवणं झाल्यावर दीपा व मनोजने आपला अभ्यास उरकला. दीपाने सर्वांची अंथरुणे टाकली. मनोजने कचरा झाडला. मग दोघांनी आजी आजोबांना हाताला धरून पलंगावर आणून बसवले. मनोज म्हणाला, ‘आजोबा, आज पहिली गोष्ट तुम्ही सांगायची. ‘अरे, गोष्ट कोणती सांगावी याचाच विचार करत होतो.

ऐका हं.’ म्हणत आजोबांनी गोष्टीला सुरुवात केली. ढोलपुरात जागूमल नावाचा एक धोबी राहात होता. तो आपल्या गाढवावर कपड्यांची बोचकी लादून ती नदीवर नेत असे. मग गाढवाला नदीकिनारी चरायला सोडून देई. जागूमलचे कपडे धुऊन होईपर्यंत गाढव शांतपणे चरत राही. मग गाढवावर पुन्हा धुतलेले कपडे लादून धोबी घराकडे परत येई.

जागूमलचे गाढव गुणवान व शांत स्वभावाचे होते. एके दिवशी जागूमलचे गाढव चरायला सोडले व कपडे धूत बसला. संध्याकाळी कपडे धुवून व बोचकी बांधून तो गाढवाला शोधू लागला पण त्याला गाढव आढळले नाही. त्यांनी खूप शोध घेतला. गावात व इतरही चौकशी केली, त्याचे गाढव चोरीला गेले होते. अखेर त्याने नवे गाढव खरेदी करायचे ठरवले. तो जनावरांच्या बाजारात गेला. तिथं काही गाढवं पाहात असताना त्याला एक इसम त्याचेच गाढव विकायला घेऊन आल्याचे दिसले.

जागूमल त्या इसमाला म्हणाला, ‘हे गाढव माझे आहे. तू ते चोरले आहेस.’ ‘अरे वा रे वा! गाढव माझे, मी विकतो आहे आणि तू म्हणतोस माझे!’ तो इसम बाह्या सरसावत जागूमलच्या अंगावर धावून आला दोघांचे भांडण सुरू झाले. ही गर्दी जमली. तिथे एक जमादार आला.

तेव्हा जागूमल म्हणाला, ‘साहेब, हे गाढव माझे आहे. याने ते चोरून विकायला आणले आहे.’ तो इसम म्हणाला, ‘गाढव माझे आहे. हा खोटा आळ घेत आहे.’

‘खर्‍या-खोट्याची आता परीक्षा करू.’ असे म्हणत जागूमलने अंगावरचा सदरा काढला व गाढवाच्या डोळ्यावर बांधला आणि त्या इसमाला म्हणाला, ‘सांग बघू हे गाढव कोणत्या डोळ्याने आंधळे आहे?’

तो इसम गडबडला व चाचरत म्हणाला, ‘त्यात काय एवढे? हे गाढव डाव्या डोळ्याने आंधळे आहे.

जागूमलने गाढवाच्या डोळ्यावरचा सदरा काढला व जमादारला म्हणाला, ‘साहेब माझे गाढव आंधळे नव्हतेच. हा खोटं बोलतोय हे सिद्ध झाले आहे.

तरी माझे गाढव मला परत द्या.’जमादाराने जागूमलचे गाढव त्याला परत दिले. ‘कशी वाटली गोष्ट?’ आजोबांनी विचारले. ‘छोटी होती पण छान वाटली.’ दीपा म्हणाली.