अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळ जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या पाठीशी

कविता नावंदे यांची बदली न करण्याची निवेदनाद्वारे मागणी

अहमदनगर- चांगले अधिकारी शहरास लाभले तर शहराचा विकास नक्की होतो. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी क्रीडा संकुलमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील अपप्रवृत्ती थांबविण्यासाठी नावंदे यांची जिल्ह्याला गरज आहे. तरी त्यांची बदली करू नये अशी मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाने केले आहे.

या संदर्भात मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी इंजि. अभिजीत वाघ, भैरवनाथ वाकळे, आसिफखान दुलेखान, तुषार सोनवणे, दीपक शिरसाठ, रामदास वागस्कर, अरुण थिटे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी मार्च 2019 मध्ये पदभार स्विकारल्यापासुन जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध सुधारणा केल्या आहेत. शालेय क्रीडा स्पर्धेची नोंदणी आणि शुल्क ऑनलाईन पध्दतीने करुन क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता आणली आहे. जलतरण तलावाची व्यापक निविदा मागविल्याने राज्य शासनास क्रीडा संकुल विकासासाठी 27 लाखांचा महसुल मिळाला आहे. त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे काहींचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या बदलीसाठी ते प्रयत्नशिल असुन खेळाडू विद्यार्थी आणि पालकांची अडवणुक करत आहेत. स्पर्धांमध्ये दबाव टाकुन अडथळे आणत आहेत.

शहरातील सजग नागरिक कर्तव्यदक्ष आणि चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या पाठीशी आहोत. चांगले अधिकारी शहरास लाभले तर शहराचा विकास नक्की होतो. क्रीडा क्षेत्रातील अपप्रवृत्ती थांबविण्यासाठी कविता नावंदे यांच्यासारख्या अधिकार्‍याची अहमदनगर जिल्ह्याला गरज आहे. त्यामुळे अशी मागणी करण्यात आली आहे.