जोखमीशिवाय मिळवा निश्चित उत्पन्न

शेअर बाजारात सध्या घसरणीचा माहोल आहे. येत्या काही महिन्यातही बाजारात तेजीची शक्यता वाटत नाही. अमेरिकाचीन व्यापारी युद्ध, कच्च्या तेलाचे वाढते भाव, कंपन्यांची खराब कामगिरी, सुस्त अर्थव्यवस्था आदी कारणांचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होत आहे. केंद्रात स्थिर सरकार असले तरी बाजारपेठेत मंदी असल्याने हा चढ उतार इतक्यात थांबणार नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्यातरी लहान गुंतवणुकदारांनी शेअर बाजारापासून दूर राहणे गरजेचे आहे. शेअर बाजारात सतत घसरण होत असल्याने लाखो गुंतवणुकदारांचे नुकसान झाले आहे. यात म्युच्युअल फंडधारकांचाही समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून म्युच्युअल फंडपासून मिळणार्‍या परताव्यातही घट झाली आहे. सध्याची स्थिती पाहता पुन्हा एकदा निश्‍चित उत्पन्न देणार्‍या गुंतवणूक योजनांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. जोखीमविरहित असलेल्या योजना दिर्घकाळासाठी चांगल्या परताव्याची हमी देतात.

आरबीआय बचत बॉंडवर 7.75 टक्के परतावा

कोणत्याही जोखमीविना आपल्याला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर रिझर्व्ह बँकेचे बचत बॉंड हे उत्तम पर्याय ठरू शकेल. या बॉंडमध्ये किमान 1 हजार रुपये गुंतवणूक करू शकतो. त्यावर 7.75 टक्के परतावा मिळेल. मात्र या बॉंडचा लॉक इन पिरियड सात वर्षाचा आहे. म्हणजेच सात वर्षापर्यंत या बॉंडमध्ये गुंतवणूक करावी लागेल. अर्थात बॉंडमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी कोणतिही वयोमर्यादा नाही. जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल तर लॉक इन पिरियडमध्ये सवलत मिळेल. 60 ते 70 आणि 70 ते 80 आणि 80 पेक्षा अधिक नागरिकांसाठी लॉक इन पिरियड हा अनुक्रमे सहा, पाच आणि चार वर्षे ठेवण्यात आला आहे. सामान्य नागरिकांसाठी हा कालावधी सात वर्षांचा आहे. परंतु या गुंतवणुकीवर आपल्याला कोणतिही करसवलत मिळत नाही. या बॉंडपासून मिळणार्‍या उत्पन्नावर प्राप्तीकर भरावा लागेल. असे असले तरी हे बॉंड दिर्घकाळासाठी चांगला पर्याय ठरतील.

पीपीएङ्ग ही सर्वोत्तम गुंतवणूक

लहान गुंतवणुकदारांसाठी भविष्य निधी म्हणजेच पीपीएफ ही लोकप्रिय योजना मानली जाते. यात पाचशे रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते. पीपीएफ लोकप्रिय होण्यामागचे कारण म्हणजे परतावा आणि गुंतवणुकीतील लवचिकता होय. कोणताही गुंतवणुकदार हा देशभरातील बँकेत आणि पोस्टाच्या माध्यमातून पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो. यात 15 वर्षाचा कालावधी आहे. सध्या पीपीएफवर 7.9 टक्के व्याज दिले जात आहे. निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी पीपीएफ ही एक सर्वोत्तम योजना मानली जाते. ज्या मंडळींना कंपनीत पीएफ नसेल तसेच व्यापारी वर्गासाठीही पीपीएङ्ग योजना ङ्गायदेशीर ठरू शकतात. या योजनेतून पंधरा वर्षानंतर पैसे काढू शकतो, मात्र घर बांधकाम, आजारपण, मुलांचे उच्च शिक्षण यासाठी सहा वर्षांनंतर पैसे काढण्याची मूभा आहे. विशेष म्हणजे या योजनेतील परतावा हा करमुक्त आहे. कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. पंधरा वर्षांनतरही पाच वर्षाची मुदतवाढ घेऊन गुंतवणूक सुरू ठेऊ शकतो. याशिवाय पाल्यांच्या नावावरही पीपीएफ सुरू करू शकतो.

मुदत ठेवीचा पर्याय निवडा

सध्याच्या काळात जोखीमविरहित आकर्षक परतावा देणारे म्हणून मुदत ठेवी योजनेकडे पाहिले जाते. आरबीआयकडून व्याजदरात कपात केल्याने बँकांनी कर्जाच्या व्याजातही कपात करण्याचे धोरण सुरू केले आहे. म्हणजेच मुदत ठेवीवरचे व्याजही आपोआप कमी होणार आहे. आजघडीला बहुतांशी बँका या 6.25 ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. त्याचवेळी प्राप्तीकर कलम 80 सीतंर्गत पाच वर्षाच्या मुदत ठेवीत दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. यावर मिळणारे उत्पन्न हे करमुक्त आहे. आपल्या सोयीनुसार मुदत ठेवीत 6 दिवसांपासून दहा वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. काही बँकां पेनल्टीमुक्त मुदत ठेवीचाही पर्याय ऑफर करत आहेत. दुसरीकडे खासगी आणि सरकारी बँकांच्या तुलनेत अधिक व्याज देणार्‍या अन्य बँका, सहकारी बँका, पतसंस्था, पतपेढी आदीं ठिकाणी पैसे ठेवताना खबरदारी बाळगावी. एक ते दोन टक्क्याच्या लोभापायी मोठी रक्कम गमावण्याचा धोका असतो.

मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना

दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या उच्च शिक्षण आणि विवाहासाठी बचत करण्याच्या दृष्टीने सुकन्या समृद्धी योजना हा एक चांगला पर्याय आहे. केवळ अडीचशे रुपये भरून सुकन्या समृद्धी खाते सुरू करू शकतो. या योजनेत एका वर्षात अधिकाधिक दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बँक किंवा पोस्टातही सुरू करता येते. हे खाते मुलीच्या वयाच्या 21 वर्षापर्यंत सुरू ठेवता येते. या खात्यातून 18 व्या वर्षांनंतर 50 टक्के रक्कम काढण्याची सुविधा आहे. सुकन्या समृद्धी खाते हे देशात कोणतेही ट्रान्सफर करता येते.

पोस्टात रिकरिंग अधिक ङ्गायदेशीर

निश्‍चित परतावा देणार्‍या योजनेत रिकरिंग खाते (आवर्ती ठेव योजना) हा चांगला पर्याय मानला जातो. पोस्टात सध्या आरडीवर 7.2 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. या व्याजाला त्रैमासिक रुपातूनही जोडले जावू शकते. या सॉव्हेरिन गॅरंटीमुळे ही योजना सुरक्षित देखील आहे. अर्थतज्ञांच्या मते, कोणत्याही लहान गुंतवणुकदारांसाठी अन्य योजना किंवा मुदत ठेवीपेक्षा आरडी योजना उत्तम ठरू शकते.

पोस्टात पाच वर्षासाठी आरडी सुरू करता येते. जर एखादा गुंतवणूकदार दहा रुपये दरमहा गुंतवणूक करत असेल तर पाच वर्षानंतर त्याला 725.05 रुपये मिळू शकतात. पोस्टातील रिकरिंग खात्यास एक्स्टेक्शनही देऊ शकतो. त्याचवेळी बँका एक वर्षापासून दहा वर्षापर्यंतचा पर्याय देत आहेत. अर्थात बँकांच्या तुलनेत पोस्टात अधिक व्याज दिले जात असल्याने तेथे आरडी सुरू करणे ङ्गायदेशीर आहे. म्हणजेच बँकेपेक्षा पोस्टातून अधिक परतावा मिळू शकतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा