कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गृहपयोगी वस्तूंच्या 1200 किट रवाना

अहमदनगर – कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून हजारो हात पुढे आले. नगर जिल्हा देखील त्याला अपवाद नाही. नगर शहरातून देखील मदत गेली. अशीच मदत आय लव नगरने शहरातील सामाजिक संस्थांच्या मदतीने गोळा केली. ही मदत युवा उद्योजक तथा आय लव नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्या उपस्थित कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावी स्वातंत्र्यदिनी रवाना करण्यात आली.

आय लव नगरच्या नेतृत्वाखाली युवान, इताशा ग्रुप यांच्या सहकार्याने नगर शहरासह ग्रामीण भागातून पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली. आय लव नगरच्या आवाहनाला नगरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. हजारो हात मदतीला सरसावले. अवघ्या तीन ते चार दिवसांत मदतीचा ओघाने एका त्सुनामी लाटेचे स्वरुप आले. धान्य, औषधे, कपडे, सीलबंद पाणी बॉटल, गृहपयोगी वस्तू, चादरी, कोरडा खाऊ लोकांनी आणून दिला. बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील अक्षय कर्डिले मित्रमंडळ एक टेम्पोभर मदत केली. यात धान्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्व साहित्य होते. चिचोंडी शिराळ (ता. पाथर्डी) येथील ग्रामस्थांनी एक टेम्पोभर सीलबंद पाण्याच्या बाटल्या पाठवून दिल्या. या मदतीचा ओघ काही आटत नव्हता. मदतच गोळा करायची, मग ती कधी पाठवायची, असा प्रश्‍न होता. त्यामुळे मदत येण्याबरोबर दुसरीकडे त्याचे नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविण्याचे नियोजन सुरू होते.

नरेंद्र फिरोदिया यांनी मदतीच्या साहित्याची पाहणी केली. त्यांच्या लक्षात आले की, गहू, बाजरी आणि ज्वारी हे धान्य स्वरुपात आले आहे. परंतु कोल्हापूर आणि सांगली येथील परिस्थिती पाहता तिथे हे पूरग्रस्तांना दळता येणार नाही. त्यामुळे त्यांनी हे धान्य दळण्याची सूचना केली. त्यानुसार हे धान्य दळून आणण्यात आले. नरेंद्र फिरोदिया यांच्या संकल्पनेतून जमा झालेल्या साहित्याची किटच तयार करण्याची सूचना आली. त्यानुसार सुमारे 1200 किट तयार झाल्या. ही किट तयार करताना अनेक वस्तूंची कमतरता होती. ती नरेंद्र फिरोदिया यांनी भरून काढली.

या किटमध्ये मीठापासून ते पिठापर्यंत आणि औषधापासून ते बादलीपर्यंत, सीलबंद पाणी बॉटलपासून ते मेडिक्लोरपर्यंत सर्व काही असलेली ही किट तयार करण्यात आली. ही किट तयार करण्यासाठी आय लव नगर, लेटस् अप, युवान, न्यू आटर्स कॉलेजमधील एनसीसी विद्यार्थी असे शेकडो हात राबले. आय लव नगरचे विभागप्रमुख मेहेरप्रकाश तिवारी, लेटस् अपचे हर्ष बोकाडिया, युवानचे संदीप कुसळकर, इताशा ग्रुपच्या नेहा देडगांवकर यांनी त्याचे नेतृत्व केले.

अशी आहे किट

गोडतेल पिशवी, तांदूळ, साखर, पीठ, डाळ, शेंगदाणे, फरसाण, मीठ, चहापावडर, कपडे धुण्याची पावडर, डेटॉल, साबण, मसाला, टूथब्रश, मच्छर अगरबत्ती, बिस्किट, टॉवेल, रुमाल, सीलबंद पाणी बाटली, बादली, सतरंजी अशी ही किट आहे.

पूरग्रस्तांना नगर शहरातून स्वातंत्र्य दिनी मदत पाठवित आहोत. शेकडो नगरकारांनी ही मदत गोळा केली आहे. त्यासाठी हजारो हात राबले आहेत. ही मदत स्वातंत्र्य दिनी पाठविण्याचा उद्देश म्हणजे, धर्म, पंथ, जात यापेक्षा मानवता आणि देश पहिला असल्याची संदेश देणारी आहे.

नरेंद्र फिरोदिया

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा