दुसऱ्या सहामाहीत घरे महागणार?

गेल्या अनेक वर्षांपासून देशातील मोठ्या शहरातील निवासी मालमत्तेच्या किंमतीत स्थिरता राहिली आहे किंवा घसरण झाली आहे. मात्र आगामी सहा महिन्यात घराच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्याच्या काळात मागणीत वाढ झाल्याने घराच्या विक्रीत वेग येण्याची शक्यता रिअल इस्टेट तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. रेपो रेटमधील कपात आणि जीएसटी सवलत यामुळे घरांच्या मागणीला वेग आला आहे. ज्या ठिकाणी मागणी वाढली आहे, तेथे किंमत कमी होण्याला काहीअंशी ब्रेक लागला आहे. तज्ञांच्या मते, रिअल इस्टेट बाजारात विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. यातून निवासी मालमत्ता महाग होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षात दिल्ली, बंगळूरसारख्या शहरात घराच्या किंमती कमी झाल्या होत्या. त्याचवेळी मुंबई, हैदराबाद आणि पुण्यात घराच्या किंमती दोन ते तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष 2020 च्या मध्यापर्यंत बाजाराचा कल बदलण्याची चिन्हे आहेत. त्यात प्राइस ग्रोथमध्ये तेजी येईल, असे सांगितले जात आहे. मागणी वाढल्याने किंमतीत वाढ होईल. तज्ञांच्या मते, सध्याच्या आर्थिक वर्षात सरकारच्या धोरणातील उपायाचा परिणाम देखील रिअल इस्टेटवर दिसू लागले आहेत. अर्थात निवडणूका सुरू असल्याने काही मंडळी घर खरेदीचा निर्णय काही काळासाठी टाळू शकतील.