होमलोन ट्रान्स्फर: तोट्याचा व्यवहार नको !

वर्षभरात आरबीआयने रेपोरेटमध्ये विक्रमी कपात करून कर्जदारांना दिलासा दिला आहे. नवे किंवा जुने कर्जदारांवरील हप्त्याचा बोझा काही अंशी कमी होणार आहे. आरबीआयच्या निर्णयाचा लाभ आता ग्राहकांना मिळण्यास सुरवात झाली आहे. अशा स्थितीत आपण विद्यमान बँकेत गृहकर्जावर अधिक व्याज भरत असेल तर तुलनेने कमी व्याज आकारणार्‍या अन्य बँकेत कर्ज स्थांनातरित करु शकतात. अर्थात कर्जाचा कालावधी हा दहा वर्षापेक्षा अधिक असेल तर हा बदल फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय सध्याच्या व्याजदरापेक्षा नवीन बँकेचा व्याजदर हा एक टक्क्यापेक्षा कमी असेल तर बँक बदलणे हिताचे ठरेल. त्यापेक्षा कमी कालावधी असेल किंवा व्याजाचे प्रमाण कमी असेल तर तो ‘घाटे का सौदा’ ठरेल.

खर्चाचे आकलन करा

गृहकर्ज स्थानांतरित करण्यापूर्वी नवीन बँकेची प्रक्रिया शुल्क, मालमत्तेचा खर्च, कागदपत्रांवर होणारा खर्च, मुद्रांक शुल्क, विमा आदींचे आकलन करावे. अर्थतज्ञांच्या मतांनुसार दुसर्‍या बँकेत गृहकर्ज स्थानांतरित करण्याअगोदर खर्च आणि बचतीचा ताळमेळ बघायला हवा. जर कर्ज स्थानांतरित करण्याचा खर्च आणि बचत यांच्यातील अंतर कमी असेल तर तो फायद्याचा सौदा ठरणार नाही. अशा स्थितीत आपण विद्यमान बँकेकडे कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी अर्ज करु शकता. विद्यमान बँक ही कर्जफेडीचे नियोजन आणि क्षमतेचे आकलन करून व्याजदर कमी करु शकते. यापोटी काही शुल्क भरुन व्याजदर कमी करुन घेता येतो. यात दोन पर्याय असतात, एकतर हप्ता कमी करणे किंवा कर्जाचा कालावधी कमी करणे. आपल्या गरजेनुसार पर्यायांची निवड करायला हवी.

दिर्घकाळासाठी फायदेशीर

आपण एखाद्या बँकेकडून 50 लाखाचे कर्ज 20 वर्षासाठी घेतले आहे असे समजा. बँकेने 10.5 टक्के व्याजदर आकारला असेल तर त्यानुसार घराचा हप्ता हा 49,919 रुपये असेल. जर कर्जाचा कालावधी हा दहा वर्षाचा राहिला असेल आणि बँकेला 30 लाख रुपये द्यायचे असेल तर अशा स्थितीत कर्ज स्थानांतरित करणे फायद्याचे राहिल. जर दुसरी बँक 9 टक्के दराने गृहकर्ज देत असेल तर आपला हप्ता 38,003 रुपये राहिल. त्यानुसार कर्ज स्थानांतरित करुन आपण हप्त्यात बर्‍यापैकी बचत करु शकतो.

एक वर्षानंतर बदलण्याचा पर्याय

गृहकर्जाचा नवा पर्याय निवडण्यासाठी आपण विद्यमान बँकेचे किमान 12 हप्ते भरणे अपेक्षित आहे. म्हणजेच एका वर्षानंतर आपण दुसर्‍या बँकेत कर्ज स्थानांतरित करण्यास परवानगी मिळते. अर्थात दुसर्‍या बँकेत गृहकर्ज स्थानांतरित करणे ही सोपी बाब नाही. नवीन बँक आपल्या आर्थिक स्थितीची तपासणी करेल. ट्रॅक रिकॉर्ड आणि सिबिल स्कोर पाहिल्यानंतरच कर्ज स्थानांतरित करण्याची मूभा मिळते. जर आपण वेळेवर हप्ते न भरल्यास त्याचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर अन्य बँक देखील आपल्याला गृहकर्ज स्थानांतरित करण्याची सवलत देणार नाही.

ङ्गिक्स्ड किंवा फ्लोटिंकपैकी अचूक पर्याय कोणता

जर आपण गृहकर्जाचे बॅलन्स ट्रान्सफर करत असाल तर व्याजाचा दर फिक्स्ड किंवा फ्लोटिंग यापैकी कोणता फायदेशीर राहिल, असा प्रश्‍न पडतो. जर आपण फिक्स्ड रेटमध्ये कर्ज घेतले असेल तर फ्लोटिंगची निवड करु शकता. अनेक बँका फ्लोटिंगमध्ये कमी व्याजदरावर गृहकर्ज उपलब्ध करुन देतात. जर आपल्याला फिक्स्ड व्याजदरावर कर्ज हवे असेल तर तो पर्याय देखील उपलब्ध आहे. अर्थात बहुतांश बँका तीन वर्षासाठी फिक्स्ड दरावर गृहकर्ज देतात. त्यानंतर तो व्याजदर फ्लोटिंगमध्ये परावर्तीत केला जातो.

व्याजदराचे आकलन करा

गृहकर्ज ट्रान्सफर करण्यापूर्वी अगोदरच्या बँकाकडून आकारण्यात येणार्‍या व्याजदराची तुलना करा. सध्याच्या काळात गृहकर्जावर 8.40 ते 12 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जात आहे. कर्ज स्थानांतरित करताना सरकारी बँकाना प्राधान्य द्यायला हवे, असे तज्ञांचे मत आहे. खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांचे व्याजदर कमी असतात. अर्थात त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

क्रेडिट स्कोर तपासून पाहा

अन्य बँकेत गृहकर्ज स्थानांतरित करण्यापूर्वी आपला क्रेडिट स्कोर तपासून पाहणे गरजेचे आहे. खराब सिबिल स्कोरमुळे आपला अर्ज नामंजूर होऊ शकतो. त्यामुळे नवीन बँकेत कर्ज मिळवण्यासाठी चांगला सिबिल स्कोर राखण्याचा प्रयत्न करा. चांगला स्कोर असल्यास कमी व्याजदरात लोन ट्रान्सफरची सुविधा मिळते. त्याचबरोबर अन्य शुल्कात सवलतही मिळू शकते.

या कागदपत्रांची गरज

गृहकर्ज स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव दाखल करताना अर्जदाराचा फोटो, खात्याची माहिती, ओळखपत्र, उत्पन्नाचा पुरावा आदी कागदपत्रांची गरज भासते. त्याचबरोबर सध्याच्या बँकेकडून मालमत्तेची हमी मिळवणे आवश्यक आहे. आतापर्यंतचे कर्जफेडीचे विवरण आणि मालमत्तेची प्रत सादर करावी लागते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा