तरूणास मारहाण करीत पैशांची चोरी

अहमदनगर – मोटारसायकलवरून आलेल्या तीन इसमांनी 25 वर्षीय तरूणास मारहाण करीत त्याच्या खिशातील 45 हजार रूपये रोख बळजबरीने काढुन नेऊन चोरी केल्याची घटना जीपीओ चौकात गुरूवारी (दि.7) रात्री 8 च्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रमेश गोरख जाधव (वय 25, रा. रायगव्हाण, ता. श्रीगोंदा) हा तरूण मोटारसायकलवरून जीपीओ चौकातुन कापुरवाडीकडे जात असताना चौकात तो चहा पिण्यासाठी थांबला असता. पाठीमागुन आलेल्या मोटारसायकलवरील तिघांनी त्याला अडवले. एकाने त्याला मागुन पकडले, दुसर्‍याने त्याच्या पँटच्या खिशात ठेवलेले 45 हजार रूपये बळजबरीने काढले. त्यावेळी जाधव याने प्रतिकार केला असता तिघांनी त्याला मारहाण केली व आजुबाजुच्या नागरिकांना दमबाजी करीत त्यांच्या बजाज कंपनीच्या बॉक्सर (क्र. एम एच 12 ए व्ही 4673) वर बसुन पळ काढला.

तिघांपैकी एक चोरटा उंच, सडपातळ बांधा, रंगाने सावळा व थोडी दाढी वाढलेली असल्याचे जाधव यांनी सांगितले. तर दुसर्‍याच्या अंगात काळे जॅकेट, जिन्सची पँट, मजबुत बांधा व केस वाढलेले असल्याचे सांगितले.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी जाधव यांच्या फिर्यादीवरून भादंविक 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार हे करीत आहेत.