जखम झाल्यावर वांगे, भात, तेल इ. खाऊ नये; हे खरे आहे काय?

जखम झाल्यावर काय करावे वा काय करू नये, याबाबतीत बरेच काही ऐकायला मिळते. जखमेवर चुना, हळद लावतात. तांब्याचा पैसा लावतात. कधी कधी तर काही रुग्ण तांदूळ, गहू वा ज्वारीचा चुरा लावतात. रक्त थांबविण्यासाठी हा प्रकार रूढ झाला असावा. पाणी लावले तर जखमेत पू होतो या समजाने बरेच लोक जखम स्वच्छ पाण्याने धूत नाहीत. साहजिकच त्यामुळे जखमेत गेलेल्या मातीतील जंतुंमुळे जखमेत पू होतो.

सर्वसामान्यपणे काही पदार्थांना वातूळ समजले जाते. यात तेल, तूप, वांगे, भात, शेंगदाणे इत्यादींचा समावेश होतो. ह्या कल्पनांचे मूळ आयुर्वेदिक उपचारामध्ये सापडते. आयुर्वेदात थंड- गरम पदार्थ, सूज निर्माण करणारे पदार्थ अशा संकल्पना आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्रात मात्र अशा संकल्पना नाहीत. जखम भरून येण्यासाठी पुरेशी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे (विशेषतः जीवनसत्त्व-क) शरीराला पुरवली पाहिजेत; असे आधुनिक वैद्यकशास्त्रात मानले जाते. वांगे, भात, तेल, शेंगदाणे इ. न खाताही जर व्यक्ती समतोल आहार घेऊ शकत असेल; तर हेच पदार्थ खा असा आग्रह धरण्याची गरज नाही; परंतु या पथ्यापथ्याच्या नावाखाली व्यक्तीला पुरेसा आहार मिळणार नसेल तर मात्र कोणतंही पथ्य करू नका, मिळतील ते सर्व पदार्थ पोटभर खा; असा सल्ला द्यावा लागेल.

शेवटी जखम लवकर भरून येणेच महत्त्वाचे ठरते. पथ्यापथ्याच्या पदार्थाबाबत शास्त्रीय संशोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळेच ते योग्य वा अयोग्य हे सांगणे अवघड आहे. समतोल आहार मिळाल्यास हे पदार्थ न खाल्ले तरी काहीच बिघडणार नाही.