स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

कर्करोग : स्त्रियांचा छुपा शत्रू

जननेंद्रिय कर्करोग निदान गर्भाशयमुखावर जुनी जखम किंवा गाठ आलेली असेल, तिथे विकृत अनियमित वाढ झालेली असेल तर कर्करोग असण्याची शक्यता असते. डॉक्टर योनिमार्गातून तपासणी करताना, जर गर्भाशयमुखाला धक्का लागला व त्यातून रक्तस्राव झाला, तसेच लैंगिक शारीरिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, अनियमितपणे दुर्गंधीयुक्त लालसर, पिवळसर रक्तस्राव होत असेल तरी कर्करोग असू शकतो. वरील सर्व लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टर खालील तपासण्या करून कर्करोगाचे निदान करतात.

1) पॅपस्मिअर तपासणी : गर्भाशयमुखातून स्रवणार्‍या पेशीची तपासणी केली जाते. ही तपासणी अगदी साधी, बिनत्रासाची व कमी खर्चाची असते. अगदी प्राथमिक अवस्थेतील कर्करोगाचे निदान या तपासणीद्वारे करता येते.

2) बायॉप्सी : गर्भाशयमुखावर एखादी गाठ दिसत असेल, जुनी जखम असेल, किंवा अनियमित विकृत वाढ झाली असेल, तर तेथील एक लहान तुकडा या शस्त्रक्रियेमध्ये तपासणीसाठी काढून घेतात. हीदेखील अतिशय साधी, सोपी व कमी खर्चाची तपासणी आहे. काही स्त्रिया भीतिपोटी तपासणी करत नाहीत. परंतु कर्करोगाचे निदान लवकरात लवकर होण्यासाठी बायॉप्सी तपासणी करून घ्यावी. म्हणजे वेळेवर निदान होऊन प्राथमिक अवस्थेतच उपचार सुरू करता येतात.

3) सोनोग्राफी : कर्करोग दुसर्‍या किंवा अंतिम अवस्थेत पसरला असेल तर सोनोग्राफीद्वारे त्याचे निदान होऊ शकते. कर्करोगाची बाधा कुठल्या अवयवांना झाली आहे हे सोनोग्राफीद्वारे समजते.

4) ’क्ष’ किरण तपासणी : कर्करोग फुफ्फुसापर्यंत पसरला आहे का, तसेच इतर काही फुफ्फुसांच आजार आहे का, याचे निदान करण्यासाठी ’क्ष’ किरण तपासणी करावी.

5) रक्त तपासणी : यामध्ये लाल व पांढर्‍या पेशींची संख्या किती वाढली आहे हे समजते. कर्करोगाच्या पेशी विकृत स्वरूपात जलद गतीने शरीरात वाढतात. त्यामुळे स्त्रीच्या घेतलेल्या आहारामधून त्याचे पुरेसे पोषण होत नाही. योनिमार्गे अनियमितपणे रक्तस्राव होत असतो. या दोन्ही कारणांनी शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण खूप कमी होते. अशा अवस्थेत रक्त तपासणी करून रक्तक्षय झालेला असेल, तर त्या स्त्रीला रक्त भरावे लागते.

गर्भाशयमुख कर्करोग लसीकरण – याचा कर्करोग होऊ नये म्हणून सध्या भारतात लस उपलब्ध झाली आहे. ही लस वयाच्या नवव्या वर्षापासून ते तेराव्या वर्षापर्यंत देतात. एचपीव्ही व्हायरसची लागण होऊ नये म्हणून ही लस लैंगिक संबंध सुरू होण्यापूर्वीच मुलामुलींना देतात. त्यामुळे साधारणत: कर्करोग होण्याची शक्यता 90%नी कमी होते. जर लहान वयात लस घेता आली नाही, तर वयाच्या 45 वर्षांपर्यंत केव्हाही ही लस घेता येते. परंतु या वयात लैंगिक संबंध होत असल्याने त्याचा प्रभाव कमी असू शकतो. याबाबतची संपूर्ण माहिती आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून घेऊन वेळीच लसीकरण करून घ्या.

कर्करोगाच्या अवस्था

1) प्राथमिक अवस्था : या अवस्थेमध्ये जननेंद्रियाच्या ज्या अवयवाला कर्करोगाची लागण होते तिथेच बाधा पसरलेली असते. आजूबाजूच्या अवयवांमध्ये त्याचा प्रसार झालेला नसतो. त्यामुळे वेळीच त्या अवयवापुरती शस्त्रक्रिया केली की स्त्रीरुग्ण पूर्णपणे बरी होते.

2) द्वितीय अवस्था : या अवस्थेमध्ये कर्करोग उदर पोकळीतील आजूबाजूच्या अवयवांपर्यत पसरलेला असतो. परंतु खोलवर अस्थीपर्यंत पोहोचलेला नसतो. या अवस्थेमध्ये अवयवांच्या शस्त्रक्रियेबरोबरच आजूबाजूच्या लसिका ग्रंथीदेखील काढून टाकाव्या लागतात. तसेच यासोबत केमोथेरपी करून स्त्रीचे आयुष्य वाढवता येते.

3) तृतीय अवस्था : या अवस्थेमध्ये कर्करोग शरीरातील सर्व अस्थीपर्यंत पसरलेला असतो. तसेच लसिका ग्रंथीमार्फत तो संपूर्ण शरीरात पसरलेला असतो. शरीरातील सर्व अवयवांना याची लागण झालेली असते. या अवस्थेतील रुग्णांना केमोथेरपी करून उरलेले आयुष्य कमी त्रासात थोडेफार वाढवता येते. परंतु या अवस्थेमध्ये उपचाराचा फारसा लाभ झालेला दिसत नाही.

 डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स.9 ते 12