स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

कर्करोग : स्त्रियांचा छुपा शत्रू

कर्करोग हा एक पेशी रोग आहे. या रोगामध्ये एखादी विशिष्ट प्रकारची पेशी अमर्याद संख्येने व तितक्याच वेगाने शरीरामध्ये वाढू लागते. पेशींच्या विकृत वाढीमुळे त्यांचे पोषण करण्यासाठी पोषकद्रव्ये खूप पटीत लागतात. त्यामुळे रुग्णाने घेतलेला आहार व त्यातून होणारे पोषण पेशींना कमी पडते. या पेशी शरीरामध्ये ज्या अवयवात पोहोचतील तिथे त्या अवयवाची हानी करण्यास सुरुवात करतात. यालाच कर्करोग असे म्हणतात. स्त्रियांमध्ये गर्भाशय, गर्भाशयमुख, बीजकोष, योनिमार्ग व स्तन यांच्यामध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. आपण या प्रकरणामध्ये फक्त स्त्रियांमधील जननेंद्रियामध्ये होणार्‍या कर्करोगाविषयी माहिती घेणार आहोत.

1) गर्भाशय कर्करोग – गर्भाशयाचा कर्करोग हा खालील महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो : * वयाच्या साठीनंतरच्या महिलांमध्ये * ज्या स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या पन्नाशीनंतरही चालू राहते * अति रक्तदाब, स्थूलता, मधुमेह हे व्याधी असणार्‍या स्त्रियांमध्ये * स्वत:च्या रक्ताचे नातेवाईक असणार्‍या इतर स्त्रियांना कर्करोग झालेला असेल तर * गर्भाशयावर व गर्भाशयामध्ये गाठी झाल्या असतील तर

2) बीजकोष कर्करोग – रक्तातील नात्यामध्ये कोणाला बीजकोषाचा कर्करोग झालेला असेल, तर अशा स्त्रियांमध्ये कर्करोगाची लागण होण्याची शक्यता असते. या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होणे अवघड असते. कारण कुठलेच लक्षण दिसून येत नाही. जेव्हा कर्करोग संपूर्ण कटीभागी पसरतो त्यावेळी सोनोग्राफीदारे या आजाराचे निदान होते.

3) गर्भाशयमुख कर्करोग – गर्भाशयमुख हा गर्भाशयाचाच खालच्या तोंडाचा भाग असतो. परंतु याला कर्करोग झाला तर दिसणारी लक्षणे गर्भाशयाला होणार्‍या कर्करोगापेक्षा वेगळी असतात. म्हणून याचा स्वतंत्र विचार व्हायला हवा. गर्भाशयमुखाचा कर्करोग रजोनिवृत्ती होणार्‍या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. * खूप बाळंतपणे झालेल्या स्त्रिया * लवकर लग्न झालेल्या स्त्रिया * अनैतिक व्यभिचारी शारीरिक संबंध * शारीरिक संबंधांनंतर योनिमार्गे रक्तस्त्राव होणे * मासिक पाळीशिवाय इतर वेळी अधूनमधून रक्तस्त्राव होणे.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स.9 ते 12