स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र -आरोग्य सखी

संततिप्रतिबंधक उपाय

यामध्ये बीजवाहक नलिका पकडून तिला रबरबँडप्रमाणे प्लॅस्टिकचा बँड अडकून देतात. या बँडमुळे नळी दबली जाऊन बंद होते, त्यामुळे गर्भधारणा होत नाही. या शस्त्रक्रियेमध्ये बीजवाहक नलिका कापली जात नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया अपयशी होऊन गर्भधारणा राहण्याचा संभव हा टाक्याच्या ऑपरेशनपेक्षा जास्त असतो. खात्रीशीर उपाय म्हणून पोटावर छेद घेऊन स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करावी. वेळेची अडचण असल्यास दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करावी.

या दोन्ही शस्त्रक्रिया प्रसूतीनंतर किंवा पुढील काळात कोणत्याही मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी करता येतात. 2) पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया : स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सोपी असते, कारण या शस्त्रक्रियेमध्ये पुरुषांच्या पोटाला छेद द्यावा लागत नाही. अंडाशयकातून निघालेली शुक्राणूवाहक नळी पोटात जाण्यापूर्वीच पकडून कापतात व धागा बांधतात. या शस्त्रक्रियेनंतर काही दिवस विश्रांती घ्यावी लागते. त्यानंतर दैनंदिन व कष्टाची कामे पुरुष करू शकतो. परंतु समाजातील अज्ञानामुळे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात केल्या जात नाहीत. संततिप्रतिबंधक उपायांमध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात होतात.

खरे तर बाळंतपणामध्ये स्त्रियांच्या शरीराची जास्त झीज झालेली असते. त्यामुळे पुरुषांनी मनाचा मोठेपणा दाखवून पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घ्यावी. यासाठी रुग्णालयात फक्त एक दिवस राहावे लागते. या शस्त्रक्रियेमध्ये शुक्राणूवाहक नळी ज्या ठिकाणी कापली जाते तेथून पुढे बरीच लांब नळी शिल्लक असते. त्यानंतर वीर्यकोष असतात. यामध्ये आधीच पोहोचलेले शुक्रजंतू गर्भधारणा होण्यास कारणीभूत ठरतात. अशा वेळी शुक्रजंतू पूर्णपणे निघून जाईपर्यंत दुसरा कोणता तरी संततिप्रतिबंधक उपाय तात्पुरता वापरावा. तीन महिन्यांमध्ये हे सर्व शुक्रजंतू शरीराबाहेर वीर्यामार्फत टाकले जातात. त्यानंतर वीर्याची तपासणी करून त्यात शुक्रजंतू नाहीत ना याची पूर्ण खात्री करून मगच कुठलेही साधन न वापरता शारीरिक संबंध ठेवावेत. पुरुष नसबंदीमध्ये ही काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. गर्भधारणेसाठी योग्य वेळी दोन अपत्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी या साधनांचा वापर करावा. आणि अपत्यप्राप्ती झाल्यानंतर कायमस्वरूपी स्त्री किंवा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घ्यावी. (क्रमश:)

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर अहमदनगर

मोबाईल नं- 8793400400 वेळ स. 9 ते 12