स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

क) कष्टार्तव (Dysmenorrhea) – यामध्ये रजःस्राव होताना उदर व कटीभागी अतिशय वेदना होणे, काही स्त्रियांमध्ये योनिभागीदेखील वेदना होणे, पाळीपूर्व अस्वस्थता, मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी साधारणत: आठ दिवसांपासून ओटीपोटांमध्ये वेदना, मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी अस्वस्थ वाटणे, नैराश्य वाटणे, मन हळवे होणे, छोट्याशा कारणांवरून रडायला येणे, संपूर्ण अंगामध्ये जडपणा वाटणे, स्तनांमध्ये वेदना होणे ही लक्षणेही जाणवतात. यालाच मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीची लक्षणे (Premenstrual Symptom) असे म्हणतात. ओटीपोटातील वेदना तीव्र होऊन पाळीची सुरुवात होते. या वेदनांमुळे स्त्री या दिवसांमध्ये दैनंदिन कामे व्यवस्थित करू शकत नाही. तिचे लक्ष सारखे वेदनेकडे जाते.

काही स्त्रियांमध्ये या काळात ओटीपोटाबरोबरच संपूर्ण अंग दुखणे, डोके दुखणे, मलावष्टंभाचा (Constipation) त्रास होणे, मळमळ व उलटी होणे ही लक्षणे दर महिन्याला दिसतात. अशा अवस्थेत बर्‍याच मुलींना शाळा, कॉलेज बुडवून घरीच थांबावे लागते; तर काही स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी जाता येत नाही. जर वेदनांचे स्वरूप तीव्र असेल व नेहमीच प्रत्येक पाळीत त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. हा व्याधी स्वतंत्र तसेच परतंत्र असू शकतो. मासिक पाळीतील रजः स्राव कधीही संपूर्णपणे वेदनारहित होत नाही.

बीजनिर्मितीमुळे पाळीमध्ये वेदना होतात. हा वेदनांचा त्रास प्रत्येक स्त्रीच्या मानसिकतेवर व सहनशीलतेवर अवलंबून असतो. सहसा उच्चभ्रू, सुखवस्तू तसेच बैठे काम करणार्‍या स्त्रियांमध्ये या व्याधीचे प्रमाण जास्त आढळते. सुरुवातीला साधारणत: काही वर्ष बीजनिर्मिती होत नसल्याने मासिक पाळीमध्ये वेदना होत नाही. परंतु दोन-तीन वर्षानंतर बीजनिर्मिती सुरू होऊन ओटीपोटात दुखते.

सहसा 40-50% मुलींना कष्टार्तवाचा त्रास होत असतो. यातील काही मुलींचा लग्नानंतर कष्टार्तवाचा त्रास कमी होतो; तर काहींचा त्रास पहिल्या प्रसूतीनंतर कमी होतो. साधारणत: या वेदना पुढील कारणांमुळे होतात : अ) शारीरिक कारणे – 1) गर्भाशयाची कमी वाढ 2) गर्भाशयामध्ये दोष असणे 3) गर्भाशय मुख बंद होणे 4) हार्मोन्समध्ये असंतुलन होणे 5) आंतरजननेंद्रियांना जंतुसंसर्ग होणे 6) गर्भाशय, बीजकोष यांमध्ये गाठी असणे

अ) शारीरिक कारणे – 1) गर्भाशयाची कमी वाढ : गर्भाशयाची वाढ व्यवस्थित न झाल्याने रजस्रावाच्या वेळी स्नायूंचे अचानक आकुंचन होते व वेदना होतात. 2) गर्भाशयामध्ये दोष असणे : गर्भाशयाला दोन कप्पे (Bicornuate Uterus) असतील, गर्भाशयामध्ये पडदा असेल, तर स्नायूंची रचना व वाढ योग्य प्रमाणात नसते. त्यामुळे त्या स्नायूंचे कार्यही प्राकृत होत नाही. अशा अवस्थेत स्नायू आकुंचन पावताना वेदना होतात.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12