गुरूनानक देवजी आंतरराष्ट्रीय नगर कीर्तन यात्रेचे शुक्रवारी नगरमध्ये आगमन

शेंडी बायपास चौकात होणार जंगी स्वागत; ए.सी डेपो गुरुद्वारा दर्शनाची व्यवस्था

अहमदनगर- गुरूनानक देवजी यांचे 550 व्या गुरपुरब (जयंती) निमित्त ननकाना साहिब, पाकिस्तान येथून निघालेले आंतरराष्ट्रीय नगर कीर्तन यात्रेचे स्वागत नगर शहरात शुक्रवारी (दि.20) दुपारी दीडच्या सुमारास शेंडी बायपास चौक येथे करण्यात येणार आहे. यानंतर टॉपअप पेट्रोल पंप याठिकाणी दोन मिनिटं थांबा व नंतर डीएसपी चौक मार्गे नटराज हॉटेल समोरील ए.सी डेपो गुरुद्वारा याठिकाणी हे नगर किर्तन सर्व नागरिकांच्या दर्शनासाठी याठिकाणी थांबणार आहे. याठिकाणी भंडार्‍याची देखील सोय करण्यात आलेली आहे.

नाशिक, संगमनेर, कोपरगाव, राहुरी औरंगाबाद इतर ठिकाणाहून देखील भाविक दर्शनासाठी येणार आहेत. फुलांचा वर्षाव करत या नगरकिर्तन यात्रेचे डीएसपी चौक याठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. सर्व भाविक याठिकाणी उपस्थित राहून रस्ता साफ करीत या यात्रेला गुरुद्वारेपर्यंत नेण्यात येणार आहे. प्रथमच नगर वासियांना व सर्व भाविकांना गुरूनानक देवजी यांच्या जन्म स्थानावरून पवित्र श्री गुरुग्रंथसाहेब तसेच पवित्र त्यांचे चरणकमल खडाऊ आणि पवित्र पत्थर ज्याच्याशी त्यांनी वजन केले होते हे सर्व याठिकाणी दर्शनासाठी खुले राहणार आहेत. यात्रेत नववे गुरु, गुरु तेग बहादुर आणि दहावे गुरू गुरूगोविंद सिंगजी यांचे शस्रांचे देखील दर्शन नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.

ही आंतरराष्ट्रीय नगर कीर्तन यात्रा राउरकेला, कटक, संबलपुर, रायपुर, कोरबा, ग्वालियर, जबलपुर, भोपाल, इंदौर, बुरहानपुर, नागपुर, निजामाबाद, हैदराबाद, बिदर, तिखट श्री हझूर साहेब नांदेड येथून औरंगाबाद मार्गे नगरमध्ये येत आहे. तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरदयाल सिंग वाही, हरजीत सिंग वधवा, रवींद्र सिंग नारंग, राजेंद्र कंत्रोड, जनक अहुजा, प्रदीप पंजाबी आदींनी केले आहे.