देव-धर्माचा अर्थ

धर्म म्हणजे उपासना पद्धती? धर्म म्हणजे जीवनाचे आचरण? धर्म म्हणजे नीतिनियम? धर्म म्हणजे बंधनाचे बंधन? धर्म पाळणारा सामान्य माणूस अशा प्रश्नांनी जेव्हा व्यथित होतो, त्यावेळी त्याला उत्तरे देण्यासाठी संतांचे विचार आणि सज्जनांचे आचार समोर येतात. ‘ढाई अक्षर प्रेमका, पढे सो पंडित होय’ म्हणणारा कबीर.

‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असे म्हणणारे मातृहृदयी सानेगुरुजी, ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।’ म्हणणारे ज्ञानोबा किंवा ‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा।’ असे गर्जून सांगणारे तुकाराम महाराज या सा-यांचे म्हणणे ऐकले की, आपल्याला देव आणि धर्माचा उलगडा होऊ लागतो.

एकदा गुरूनानक नदीच्या पात्रात उभे राहून सूर्याला अर्घ्य देत होते. सकाळची वेळ असल्याने नदीचा घाट गजबजलेला होता. सूर्यबिंब आकाशात सोनेरी किरणांची चौफेर उधळण करीत वर येत होते. बराच वेळ झाला, तरी गुरूनानक नदीच्या पात्रातच उभे आहेत, हे पाहून त्यांचा एक शिष्य पुन्हा काठावर आला. त्यावेळी त्याने पाहिलेले दृश्य मन थक्क करणारे होते. अर्घ्य देण्यासाठी पाण्यात हात बुडविणा-या नानकांच्या ओंजळीत एक विंचू येत होता. अर्घ्य देण्यासाठी पाणी सोडल्यावर तो विंचू नानकदेवांच्या बोटाला चावायचा. त्या धडपडीत तो पुन्हा पाण्यात पडे. त्यावर नानकदेव पुन्हा लगबगीने पाण्याची ओंजळ भरून त्याला बुडण्यापासून वाचवत होते. आपल्या गुरूंना विंचवाचे विष चढले तर? या भीतीने व्याकुळ झालेला तो शिष्य पाण्यात उतरला.

गुरूनानकांजवळ जाऊन त्याने सांगितले, ‘अहो, तो विंचू तुम्हाला वारंवार चावतोय. मग त्याला तुम्ही बुडण्यापासून पुन: पुन्हा का वाचवता?’ यावर गुरूनानक उत्तरले, ‘अरे, चावणे हा विंचवाचा धर्म आहे, तर दया करणे, वाचविणे हा माणसाचा धर्म आहे. आता तूच पाहा. या विंचवाला पाण्यात पडण्याची म्हणजे मरणाची भीती आहे. सभोवती संकटे पसरली असताना जर तो आपला चावण्याचा धर्म सोडणार नसेल, तर मी तरी आपला दया करण्याचा धर्म कसा सोडू? आपल्या गुरूंच्या या उत्तरावर शिष्य निरुत्तर झाला.

धर्माचे अवडंबर माजविणा-या सनातनी लोकांनी आजवर जगभरात गोंधळ माजवला आहे आणि या गोंधळामुळे चित्त विचलीत झालेले लोक नको त्या मार्गाला जाताना दिसतात, म्हणून ‘बुडते हे जग। देखवेना डोळा। म्हणूनी कळवळा। येत असे।’ असे म्हणत तुकोबा आपल्या आयुष्याची मशाल पेटवून लोकांना खºया धर्माचा, त्याच्या परम अर्थाचा रस्ता दाखवतात. आपण त्यांच्या पावलांचे ठसे शोधण्याची ‘दृष्टी’ मिळवली, तरी पुढील वाटचाल सोपी होते.

सुख सुख सुख। भूक भूक भूक।

मनाचा आक्रोश। सदा चाले।।

धाव धाव धाव। काव काव कळ। नित्याचा उद्रेक।

आण फुले।। वीट आला विठू। नको विष कटू।

देई मुक्ती घटू। सुख ओले।।

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा