सलग 7 व्या वर्षी गोरगरिबांची दिवाळी केली गोड

घोसपुरीच्या सुनील ठोकळ यांचा सामाजिक उपक्रम

अहमदनगर- नगर तालुक्यातील घोसपुरी येथील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुनील ठोकळ यांनी सामाजिक भावनेतून गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा सुरु केलेला उपक्रम सलग सातव्या वर्षीही राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

घोसपुरी गावात मोलमजुरी करून आपली उपजिविका करणारे काही कुटुंब राहतात. त्यांना दररोजच्या रोजी रोटीची भ्रांत असल्याने सण उत्सव साजरा करणे दूरच असते, या कुटुंबांची ही परिस्थिती पाहून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुनील ठोकळ यांनी या कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला, गावातील गरीब गरजू कुटुंबांची यादी तयार केली, त्यांच्याशी संपर्क साधून दिवाळीच्या दिवशी श्री पद्मावती देवी मंदिरात त्यांना किराणा साहित्याचे वाटप केले. गेली 7 वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. या वर्षीही गरीब कुटुंबांना किराणा साहित्याचे मोफत वाटप करून या कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.

गतवर्षी त्यांनी गावातील गोरगरिबांबरोबरच जे अनाथ, वंचित आहेत, त्यांची दिवाळीही गोड करण्याचा निर्णय घेत त्यांनी नवोदय ग्रामीण विकास प्रतिष्ठान पाथर्डी संचलित अनाथ, मतीमंद मुलांच्या बालगृहात व निवासी मतीमंद विद्यालयातील मुलांना दिवाळी फराळ व शालेय साहित्य वाटप केले. त्यांचे सामुहिक वाढदिवसही केक कापून साजरे केले होते.

समाजातील दानशुरांनीही असे उपक्रम राबवून गोरगरिबांच्या घरात सण उत्सव साजरे होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सुनील ठोकळ यांनी यावेळी केले.