नर्व्ह गॅसचे काय परिणाम होतात?

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात नर्व्ह गॅस म्हणून ओळखली जाणारी अनेक रसायने विकसित केली गेली; परंतु लष्करी गोपनियतेच्या नावाखाली त्यांची माहिती लपवून ठेवण्यात आली. नर्व्ह गॅस हे सामान्य तापमानाला रंगहीन व गंधहीन अशा द्रव्याच्या स्वरूपात असतात.

तापमान वाढवल्यास मात्र त्याची विषारी वाफ सर्वत्र पसरते व दुष्परिणाम दिसून येतात. ही वाफ श्‍वासावाटे, तोंडावाटे वा डोळ्यांतील आवरणातून शरीरात प्रवेश करते. स्नायू व चेतातंतू यांच्या जोडामध्ये अॅसेटाईल कोलीन नावाचा रासायनिक पदार्थ नैसर्गिकपणे सोडला जात असतो. या पदार्थाच्या प्रभावाखाली स्नायूंचे आकुंचन होते. आकुंचनाचे कार्य झाले म्हणजे कोलीन इस्टरेज या विकराची अॅसेटाईल कोलीनवर क्रिया होते व ते निकामी केले जाते. त्यामुळे स्नायू परत शिथिल होतात.

नर्व्ह गॅसमधील रासायनिक पदार्थ या कोलीन इस्टरेजला निकामी करतात. साहजिकच स्नायू आकुंचनाच्या अवस्थेत राहतात. परिणामी हातापायाला गोळे, झटके, श्‍वास घ्यायला त्रास, नाकातून पाणी गळणे, नीट न दिसणे अशी लक्षणे दिसून येतात. असे झाल्यावर सैनिकांचे मनोबल खचते व ते पळापळ करू लागतात. जास्त प्रमाणात नर्व्ह गॅस शरीरात गेल्यास श्‍वसनास प्रचंड त्रास होऊन मृत्यू ओढवतो. इराकमध्ये आठ वर्षांपूर्वी झालेल्या इराक-कुवैत, इराक-अमेरिका युद्धाच्या वेळी, इराक असे नर्व्ह गॅस वापरेल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.