कुरुप म्हणजे काय?

कुरुप म्हणजे आपल्या कातडीला पडलेला जाड चट्टा होय. हातापायाच्या बोटांना किंवा टाचेला वगैरे असे कुरुप होतात. बोटे जेथे एकमेकांना घासतात त्या जागी किंवा चप्पल, बूट यांचा पायावर जास्त दाब पडतो त्या जागी कुरुपं येतात. काही वेळा कुरुपांमुळे खूप दुखते. कुरुपं फार दुखत असतील, तर त्यावर उपचार करावेच लागतात. कुरुपावर घासतील किंवा दाब देतील अशा प्रकारची पादत्राणे न वापरणे महत्त्वाचे ठरेल.

टाचेला कुरुप असल्यास पादत्राणे वापरताना टाचेखाली कापूस किंवा मऊ कापडाच्या घड्या ठेवाव्या. कुरुपं कमी दुखावी यासाठी पाय गरम पाण्यात 15 मिनिटं बुडवावे. छोटी कानस किंवा काटेरी ब्लेड घेऊन कुरुपाचे थर कापून टाकावे व चट्ट्याची जाडी कमी करावी. या उपायांनी दुखणे कमी होईल.

कॉर्नप्लास्टसारख्या पट्ट्या लागोपाठ 3 दिवस वापरून कुरुपं कमी होऊ शकतात. कधी कधी शस्त्रक्रियेने कुरुपं काढून टाकावी लागतात. अर्थात शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा कुरुपं तयार होऊन त्रास होऊ शकतो. होमिओपॅथिक औषधांनी कुरुपं कमी होतात असा अनेकांचा अनुभव आहे. तेव्हा होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरेल.