विजेचा शॉक बसल्यास काय होते?

लहान मुले फार उद्योगी असतात. त्यांच्या काहीतरी कारवाया चालू असतात. विजेच्या उपकरणांशी खेळणे तर मुलांना फारच आवडते. इकडचा बल्ब काढून दुसरीकडे लाव, असली काही कामे करायला मुले नेहमीच तयार असतात. कधी कधी मात्र या गोष्टी अंगलट येतात. जुनाट वायरवर ओले कपडे वाळत घालणे, प्लगमध्ये खिळा घालणे, बल्ब होल्डरमध्ये बोट घालणे इत्यादीमुळे विजेचा शॉक बसतो. विजेचा शॉक बसला नाही, असा माणूस सापडणे अवघडच आहे. पाणी तापवण्यासाठी बर्‍याच घरात वापरल्या जाणार्‍या इमर्शन रॉडचे बटण चालू असताना पाण्यात हात घातला तरी शॉक बसतो.

विजेचा शॉक हा तसा आपल्याला बारीकसा वा दोन मिनिटे झिणमिण्या आणणारा अपघात वाटला, तरी प्रत्यक्षात मात्र तो जीवघेणा असा गंभीर अपघात ठरू शकतो. आकाशात चमकणारी वीज कोणाच्या अंगावर पडली, तर ती व्यक्ती वाचत नाही. तिचा जळून अगदी कोळसा होऊन जातो. घरगुती विजेमुळे मात्र कमी-अधिक शक्तीचे धक्के बसू शकतात. डीसी वीज ही एसीपेक्षा जास्त घातक असते. महाराष्ट्रात जवळपास सगळीकडची वीज एसी आहे. आकाशातून पडणारी वीज मात्र डीसीप्रमाणे कार्य करते.

विद्युत धक्क्याचे व शॉकचे दोन प्रकारे परिणाम होतात. एक म्हणजे भाजणे व दुसरे म्हणजे मज्जासंस्था, स्नायू व हृदय यांच्यावर विद्युतप्रवाहाचा परिणाम होणे. विद्युतधक्क्यामुळे हृदयाची गती अनियमित होण्याची किंवा हृदय बंद पडण्याची शक्यता असते. शॉकमुळे स्नायू अचानक आकुंचन पावतात व त्यामुळे दूर फेकले जाणे, खाली पडणे अशा मोठ्या हालचाली होऊ शकतात. विजेचा शॉक खूप मोठा असेल, तर बेशुद्धी येते किंवा मृत्यूही ओढवतो.

वीज आणि विकास यांची सांगड आहे, हे आपण औद्योगिक क्रांतीपासून अनुभवतोय. पण वीज आणि विनाश यांच्या परस्परसंबंधाची जाणीव आपल्याला अपघातातून अधूनमधून होत असते. वीज हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना नीट काळजी घेणे अगत्याचे आहे, अन्यथा जीवावर बेतू शकते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा