ओलांडा ओलांडल्यास अंगावर फोड येतात का?

चौरस्त्यावर मध्यभागी पिवळसर अशा फडक्याच्या गाठीगाठी टाकलेल्या तुम्ही नक्कीच बघितल्या असतील. त्याच्या बाजूनेच तुम्ही गेला असाल. जरा हिंमत करून त्यात काय आहे हे बघितलेत तर लक्षात येईल की, कापडात हळद लावलेली ज्वारी वा इतर काही धान्य भरून त्याच्या गाठी मारलेल्या आहेत. यालाच ओलांडा असे म्हणतात.

खेड्यामध्ये जर मुलाला फोड आले तर चौरस्त्यावर हा ओलांडा टाकतात. यामागे असा समज असतो की जर कोणी ह्याला ओलांडून गेले, तर मुलाचे फोड त्या व्यक्तीला होतील व मूल नीट होईल. त्यामुळेच घरातील वडीलधार्‍या मंडळींनी तुम्हालाही बजावून सांगितले असेल की, रस्त्यावर असे काही दिसले की बाजूने जायचे, ते ओलांडायचे नाही.

आता यातील तथ्य पाहू. मुलाला सामान्यपणे स्टॅफीलोकोकस नावाच्या जिवाणूमुळे अंगावर फोड येतात. ते बरे होण्यासाठी अँटीबायोटिक्स द्यावे लागतात. पुन्हा हे फोड येऊ नये म्हणून रोज स्वच्छ आंघोळ करणे, साबण वापरणे, नखे वारंवार कापणे; अशा वैयक्तिक स्वच्छतेची गरज असते. या फोडातील पू जर आपल्या अंगाला लागला, तर आपल्याला त्या फोडांची लागण होऊ शकेल, अन्यथा नाही. त्यामुळे रस्त्यावर ओलांडा टाकून मुलाचे फोड जातील, ही गोष्ट चुकीची आहे.

साहजिकच ओलांडा ओलांडल्यास फोड येतील, हेही पूर्णपणे चुकीचे आहे. अशा अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळात कोणत्याही रोगावर परिणामकारक औषधे नव्हती, त्यामुळे लोक असहाय्य होते. मंत्र-तंत्र, देवदेवता, जादूटोणा इत्यादींचा रोग बरे करण्यासाठी आधार घेत.अशा अंधश्रद्धाच आपल्याला ओलांडासारख्या रूपात आजही पाहायला मिळतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा