गवाणे गावची आई श्री भावईदेवी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गवाणे गावात श्री भावईदेवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी 1 मे या महाराष्ट्र दिनी श्री भावईदेवीचा वर्धापन दिन साजरा केला जातो. भागवत धर्माचा पगडा असलेल्या कोकणच्या भूमीत धार्मिक संस्कृती व परंपरा या आजही श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या अधीन आहेत. सण व उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करणारा कोकणी माणूस ग्रामहित लोककल्याण जपत समृद्ध करणा-या सर्व बाबींमध्ये इथल्या मंदिरांचे महत्त्व असल्याने, गाव तेथे मंदिर आहेच. परिणामी कोकणात देवी-देवतांचे उत्सव मोठ्या आनंदात व भावपूर्णतेने साजरे केले जातात. अर्थात त्याला सर्व ग्रामस्थांची व मुंबईत विखुरलेल्या नोकरदारांची तेवढीच मनापासून साथ असते.

मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरेपासून सुमारे ५ कि.मी., तर देवगडपासून सुमारे ४० कि.मी.वर असलेले हे निसर्गरम्य खेडेगाव आहे. गावातील लोकांचा उदरनिर्वाह आजही भातशेतीवर चालत आहे. गावच्या चारही बाजूला प्रसिद्ध जांभ्या दगडाच्या खाणी आहेत. भावईदेवीच्या पूर्वेला गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर व दारोमचा श्री सिद्धेश्वर, श्री पावणाई, पश्चिमेला नादची नवलादेवी, दक्षिणेकडे शिरवलीचा श्री गांगेश्वर, तर उत्तरेला वेळगिवेचा पुरातन पांडवकालीन श्री सिद्ध रामेश्वर आहे. सुशिक्षितांची पंढरी म्हणून लौकिक प्राप्त या गावात उच्च सांस्कृतिक वारसा आजही जपला जातोय तो तेथील आदरपूर्वक पाहुणचार, भूमीचे पावित्र्य व कमालीची स्वच्छता या गुणांमुळे. शिक्षणाची गंगोत्री वाहत असलेल्या या गावात नाट्य, कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य यांसह राजकीय व उद्योगक्षेत्रातही इथली मंडळी अग्रेसर आहेत.

मुंबईसह विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे तसेच नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी उच्चशिक्षित लोक व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत. काही उच्चपदस्थ तर काही सुवर्णकार, उद्योजक आहेत. अशा या पावनभूमीतील श्री भावईदेवीचा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात, टाळ, मृदंगाच्या तालात सुरू होतो. संपूर्ण परिसर टाळ, मृदुंगाच्या अखंड नादात भारावून गेलेला असतो. त्याला सुस्वर भजनांची साथ असते. तत्पूर्वी उत्सवाची सुरुवात करताना सर्व इष्ट देवतांचे स्मरण करून श्रीफळ अर्पण करून गा-हाणे घातले जाते. मुख्य देवी व इतर देवींची साडी-चोळी नेसवून वस्त्रालंकारासह सजावट केली जाते. उत्सवादिवशी सकाळी साधारण ७ वाजता पुजारी देवीची यथासांग पूजा करतो व त्याच ठिकाणी श्री सत्यनारायणाचीदेखील यजमानांकरवी पूजा केली जाते.

गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वराला पालखीत बसवून वाजतगाजत देवीच्या मंडपात बसवून त्याचीही पूजा केली जाते. सकाळपासूनच मंदिरात तुडुंब गर्दी होते. या दिवशी पंचक्रोशीतील प्रमुख व्यक्तींना आमंत्रित केले जाते. आरती झाल्यानंतर भाविक देवीची खणा-नारळांनी ओटी भरतात. दुपारी गावातील सर्वांना व भाविकांना महाप्रसादरूपी भोजन दिले जाते. सायंकाळ होताच स्थानिक भजनांना सुरुवात होते. अधूनमधून ढोल-ताशे वाजतच असतात.

मंदिर स्लॅबचे असून, आधाराला खांब आहेत. या दिवशी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. परिसरात छोटी-मोठी दुकाने, हॉटेल्स थाटली जातात. मालवणी खाजा, चुरमुरे लाडूची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी अनेकांचे श्रद्धास्थान आहे.

इतर सणांपेक्षा या वर्धापन दिनास विशेष महत्त्व असल्याने घरोघरी मुंबईकर चाकरमानी मंडळी व विशेषत: नवविवाहित जोडपी व माहेरवाशिणी आवर्जून उपस्थित असतात. दुस-या दिवशी सकाळी उत्सवाची सांगता होते. प्रसाद म्हणून मिठाई, पेढे, फळे व खोब-याचे वाटप होते. असा हा आगळावेगळा उत्सव भक्ती, श्रद्धा, संस्कृती व एकात्मतेचे प्रतीकच आहे. अशा या भक्तिमय उत्सवात संपूर्ण रात्र जागवणारे निस्सीम भक्त देवीचा प्रसाद घेऊनच मुंबई-पुणेच्या दिशेने प्रस्थान करतात, ते पुढील उत्सवाच्या प्रतीक्षेने.