गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

अहमदनगर – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढील वर्षी लवकर या’ अशा जोशपुर्ण घोषणाबाजी करीत नगर शहरासह उपनगरातील गणपती विर्सजन शांततेत व उत्साहपुर्ण वातावरणात गुरुवारी (दि.12) पार पडले. मोहरम पाठोपाठ आलेल्या गणपती विर्सजनाने पोलिस खात्यावर आलेला प्रचंड ताण काल काहीसा हलका झाला.

शहरातील मुख्य मिरवणुकीमध्ये 12 मंडळांनी सहभाग नोंदविला होता. तर इतर मंडळांनी आपल्या स्वतंत्र मिरवणुका काढुन गणपती विसर्जन केले. मुख्य मिरवणुकीत पारंपारीक वाद्यासह ढोल ताशांचे पथक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणुकीत मानाच्या विशाल गणपती पाठोपाठ महालक्ष्मी तरूण मंडळ, कपिलेश्‍वर तरूण मंडळ, दोस्ती तरूण मंडळ, आदिनाथ तरूण मंडळ, आनंद तरूण मंडळ, नवरत्न तरूण मंडळ, समझोता तरूण मंडळ, निलकमल तरूण मंडळ, शिवशंकर तरूण मंडळ, माळीवाडा तरूण मंडळ व नवजवान तरूण मंडळ अशा मंडळांचा समावेश होता. तसेच मिरवुणकीमध्ये शिवसेनेच्या गणपतीचाही समावेश होता.

तर सावेडी उपनगरात स्वतंत्र मिरवणुक काढुन उपनगरातील गणपती मंडळांने आपल्या गणपतींचे विसर्जन केले.

सकाळी श्री विशाल गणेश मंदिर येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते श्रीं च्या मुर्तीची उत्थापन पुजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, विजय कोथंबिरे, बाबासाहेब खरपुडे आदी विश्‍वस्त तसेच देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते. पुजारी संगमनाथ महाराज यांनी विधीवत पुजा केल्यानंतर गणपती विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. माळीवाडा, धरती चौक येथे नागरिकांनी रस्त्यावर सडा, रांगोळी काढुन मानाच्या गणपतीची पुजा केली. तसेच पारशाखुंट, रामचंद्र खुंट येथे ही नागरिकांनी पुजा केली. रामचंद्र खुंटावरून सकाळी 12 च्या सुमारास मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी गणपतीची महाआरती करून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ केला. एका पाठोपाठ गणपती असल्याने नागरिकांनाचाही उत्साह दुणावला होता.

मानाच्या गणपतीच्या अग्रभागी नगार्‍याची बैलगाडी, सावता माळी महिला मंडळाचा दांडिया ग्रुप, र्‍हिदम ढोल पथक, बुर्‍हाणनगर येथील शिवकृपाचा ताशा पथक, रूद्रनाथ ढोल पथक, हलगी पथक, लेझिम पथक, झांज पथक हे सहभागी झाले होते. तर संपुर्ण रस्त्यावर ग्रुपने सुमारे 1400 किलो रांगोळी वापरुन दिल्लीगेट वेशीपर्यंत रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या.

चौकाचौकात मानाच्या गणपतींचे स्वागत करण्यात आले. यामध्ये आ. संग्राम जगताप, मा.आ. अनिल राठोड, उपमहापौर मालनताई ढोणे, शांतता समितीचे सदस्य, अहमदनगर शहर सहकारी बँक, अर्बन बँक, मर्चंट बँक, विश्‍व हिंदु परिषद व व्यापारी आणि नागरिकांनी ठिकठिकाणी गणपतीचे स्वागत केले. तसेच मंगलभक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी यांनी नवीपेठ येथे मानाच्या गणपतीचे उत्साहपुर्ण वातावरणात स्वागत केले.

संध्याकाळी 6 वा. ग्रामदैवत विशाल गणेश मंडळाचा गणपती दिल्लीगेट वेशीबाहेर पडला.

यावेळी कार्यकर्त्यांनी व मंडळाच्या अध्यक्षांनी पोलिसांच्या सहकार्याने वेळेत गणपती विसर्जन सुरू केले व कोठेही न रेंगाळता गणपती विसर्जन शांततेत पार पाडले. रात्री 9 पर्यंत सुमारे 7 मंडळे वेशीबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत सर्वच मंडळांनी सहकार्य करून वेळेत मिरवणुका संपवल्या.

सावेडी उपनगरात पारंपारीक पध्दतीने गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. तालयोगी ढोल पथकाने सुरू केलेल्या सामुहिक गणेश विसर्जनामध्ये सावेडी उपनगरातील घरगुती गणपती व इको-फ्रेंडली गणपतींची मिरवणुक एकत्रित परंपरेला यावर्षी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. याला ‘आय लव नगर’ विशेष सहकार्य केले.

गणपती विसर्जनसाठी मनपाने बाळाजी बुवा विहीरीवर (नेप्ती चौक) व यशोदा नगर येथे नगरसेवक निखिल वारे, बुरूडगाव रोडवरील साईनगर येथे नगरसेवक गणेश भोसले यांनी विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.

काही ठिकाणी मात्र डिजेच्या तालावर नागरिकांनी ठेका धरला. पोलिसांचे या मंडळावर विशेष लक्ष होते. मात्र कोठेही मोठा आवाज होणार नाही, याची दक्षता मंडळाने घेतल्याने कोणताही गुन्हा अद्यापपर्यंत दाखल झालेला नाही. मात्र नेता सुभाष चौकात एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय घोषणा देऊन मिरवणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस प्रशासनाने वेळेतच याकडे लक्ष दिल्याने पुढील अनर्थ टळला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा