बिनखांबी गणेश मंदिर

कोल्हापूर शहरातील मध्य वस्तीतील भव्य दगडी चिरेबंदीने बांधलेल्या मंदिराची हेमाडपंथी शैलीतील शिखर अंबाबाई मंदिराच्या शिखराशी साम्य दर्शवते. अंबाबाई मंदिरावरील शिखरे कोल्हापूर संस्थानातील छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली असल्याने बिनखांबी गणेश मंदिराचे शिखरही १७५० काळातील असण्याची शक्यता आहे.

बिनखांबी मंदिरात एकही खांब नसल्याने याला बिनखांबी मंदिर म्हटले जाते. पूर्वाभिमुख मंदिराचा भव्य प्रशस्त दरवाजा दगडी आहे. मंदिराचा सभामंडप २० फूट लांब व २० फूट रुंद आहे. मंदिरात प्रवेश करताच, दोन्ही बाजूला चौकोनी सहा दिवळ्या आहेत. भिंती चुन्याने रंगवल्या आहेत. घंटी ज्या ठिकाणी बांधली आहे, तिथे कोरीव दगडी शिल्प आहे. मंदिरात प्रवेश करताना दिसते, ती सहा फूट उंच, चार फूट रुंदीची उंच गणेश मूर्ती.

मूर्तीचे दर्शन होताच, भाविक नतमस्तक होतात. मूर्ती शेंदराने रंगवली आहे. पूर्वी या मंदिरात गणपतीची छोटी मूर्ती होती. मंदिराच्या मानाने ही मूर्ती छोटी असल्याने मंदिरात मोठ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशी भाविकांची इच्छा होती. मंदिराच्या पिछाडीस जोशीरावांचा वाडा आहे. या वाड्याच्या विहिरीची डागडुजी व गाळ काढताना गणेशमूर्ती मिळाली होती. ही मूर्ती जोशीरावांनी विहिरीच्या काठावर ठेवली होती.

या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना बिनखांबी गणेश मंदिरात करावी, अशी विनंती नागरिकांनी जोशीरावांना व तत्कालीन छत्रपतींना १८७०च्या कालावधीत केली होती, असे मंदिरातील श्रीपूजक प्रसाद उपाध्ये यांनी दिली. त्यानंतर जोशीरावांनी मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात केली. मूर्तीला जोशीरावांचा गणपती म्हणूनही स्थानिक लोक ओळखतात. आजही मूळ लहान मूर्ती मंदिरात आहे. सध्या मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे असून, गणेश जयंती व गणेश चतुर्थी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा